शोध न्यूज : भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या एका कार्यक्रमात चक्क 'राष्ट्रवादी पुन्हा.......' हे गाणे वाजले आणि जाऊन ते पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच स्वागतासाठी लावले होते. असे टायमिंग या गाण्याने साधले त्यामुळे पुणे शहरभर हा विषय धम्माल चर्चेचा ठरला आहे.
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्पर विरोधी राजकीय पक्ष आहेत. अलीकडे तर भाजपने शिंदे गटासोबत सत्ता स्थापन केल्यापासून राष्ट्रवादी आणि पवार कुटुंब यांच्यावर सतत तोफ डागली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना अडचणीत आणण्याचे एकेक प्रयत्न केले जात आहेत पण पुण्याच्या कार्यक्रमात वेगळेच घडून गेले. आपल्या पक्षाचे नेते आल्यानंतर स्वागतासाठी वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात तसेच आपल्या पक्षाशी संबंधित गाणीही लावली जातात. पुण्यात मात्र एका कार्यक्रमास भाजपचे वरिष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री कार्यक्रमस्थळी आले तेंव्हा राष्ट्रवादी पक्षाचे 'राष्ट्रवादी पुन्हा ...' हे गाणे डीजे वर वाजू लागले आणि यावेळी अनेकांची भंबेरी उडाली.
'राष्ट्रवादी पुन्हा ...' हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रचारातील गाणे आहे. या गाण्याला चांगली चाल आणि लय असल्यामुळे ते ऐकायला कानाला गोड लागते आणि ते वाजू लागले की कुणीही सहज ठेका धरू लागते. नेमके हेच गाणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात लागले गेले. पुण्यात रास्ता पेठेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील या कार्यक्रमात येताच डी जे वर 'राष्ट्रवादी पुन्हा'...' हे गाणे वाजू लागले. जणू काय, या गाण्यानेच पाटील यांचे स्वागत करण्यात येत होते. साहजिकच यामुळे अनेकजण चक्रावून गेले तर कुणाची तारांबळ उडाली. नेमके काय चाललेय हेच कुणाला कळणे कठीण झाले. भाजपचा कार्यक्रम आणि भाजपचे मंत्री असताना राष्ट्रवादीचे प्रचार गीत वाजताना पाहून अनेकजण स्तब्धही झाले होते. कुणी मात्र आपले चेहरे लपवून हसतही होते.
पुणे पोलिसांनी डीजे चालकाला ताब्यात घेतले पण ते असे गाणे वाजवले म्हणून नव्हे तर विनापरवाना साऊंड सिस्टीम लावल्याच्या कारणावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'राष्ट्रवादी पुन्हा..' चा आवाज ऐकूनही तिकडे दुर्लक्ष केले. कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता चंद्रकांतदादा यांनी तेथून काढता पाय घेतला. (Rashtrawadi punha’ song in BJP ministerial programme.) या एकूण प्रकारची जोरदार चर्चा पुण्यात सुरु झाली आहे. काहींनी सखेद आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !