BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ जाने, २०२४

जिवंतपणीच 'त्याने' दिलं तेराव्याचं जेवण, अन् चोवीस तासातच त्याला मृत्यूने गाठलं !




शोध न्यूज : जिवंतपणीच त्याने दिलं आपल्याच तेराव्याचं जेवण अन् अवघ्या  24 तासातच त्याला मृत्यूने गाठलं असल्याची एक योगायोगाची घटना समोर आली असून, या घटनेबाबत उलट सुलट चर्चाही रंगू लागली आहे.


अलीकडे काही जण आपल्याच श्रद्धांजलीच्या पोस्ट टाकून आत्महत्या करतात, अशा अनेक घटना समोर येत असतात. काही महिन्यांपूर्वी एका अधिकाऱ्याने देखील  जिवंतपणी आपला तेरावा केला होता आणि यासाठी त्याने मोठा कार्यक्रम देखील आयोजित केला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील याला साथ दिली होती. या घटनेची चर्चा राज्यभर होत राहिली आणि सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मृत्यू झाल्यानंतर करण्यात येणारे विधी जिवंतपणी करवून घेण्याचा एक नवाच फंडा समोर येत असताना अलीकडे दिसत आहे. लोकांना हे पहायलाही काहीसे विचित्र वाटत आहे पण, ज्याची त्याची इच्छा म्हणून अशा कार्यक्रमात देखील लोकांना सहभागी व्हावे लागत आहे. अशातच एक योगायोगाची मोठी घटना समोर आली आहे. आपल्याच तेराव्याचे जेवण जिवंत असतानाच दिले आणि काही तासात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


मृत्युनंतर आपल्या कुटुंबाचे काय होणार याची चिंता अनेकांना असते पण उत्तर प्रदेशातील इटा जिल्ह्यातील ही घटना मात्र वेगळी आहे. आपल्या मृत्युनंतर आपले कुटुंबीय आपला तेरावा करतील की नाही याची या व्यक्तीला चिंता होती. साकीट परिसरातील मुन्शीनगर येथे राहणारा ५५ वर्षे वयाचा हकीमसिंह यादव याच्याकडे पुरेशी शेती होती, तरी देखील ते चहाचे दुकान चालवत होते. वय वाढत असल्यामुळे त्यांच्यासमोर काही समस्या उभ्या राहिल्या होत्या, त्यातच त्यांनी बिहार येथील एका महिलेशी लग्न  केले पण त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. दुर्दैवी बाब म्हणजे त्याला एकही अपत्य नव्हते. त्यामुळे ते गरजेनुसार थोडी थोडी जमीन विकत राहिले होते.  त्यांच्या भाऊ आणि पुतण्या यांचा मात्र या जमीन विक्रीला विरोध असायचा. कारण हकीम याच्या मृत्युनंतर सदर जमीन ही भाऊ आणि पुताण्यालाच मिळणार होती.  हकीम आपली जमीन विकत असल्यामुळे त्यांच्यात वाद होत असायचा आणि हकीमला मारहाण देखील होत असायची. यार सर्व प्रकरणे हकीम सतत दु:खी राहायचा. आपला मृत्यू झाल्यानंतर भाऊ आणि पुतण्या आपला तेरावा घालणार नाहीत असे त्याला वाटत होते. त्यामुळे आपल्या मृत्युपूर्वीच आपला तेरावा घालण्याची कल्पना त्याच्या मनात आली आणि त्याने तसे आपल्या मित्रांजवळ बोलूनही दाखवले. मित्रांनी त्याला विरोध केला आणि तेरावा घालण्याऐवजी गावात भंडारा घालण्याचा सल्ला दिला पण, त्याने तो मानला नाही.


हकीमसिंहने  त्याच्या जिवंतपणीच स्वतःचा तेरावा विधी करत, आठशे लोकांना जेवण दिलं. मृत्यूपश्चात हा विधी कुटुंबीयांनी केला नाही तर आत्म्याला शांती मिळणार नाही या विचारातून त्याने हे पाऊल उचललं. त्याने जिवंतपणी आपला तेरावा घालण्याचा निर्णय घेतला आणि तशा निमंत्रण पत्रिका देखील छापल्या. गावात सगळीकडे वाटल्या आणि जवळपास आठशे लोकांना त्याने आपल्याच तेराव्याचे जेवणही दिले. या जेवणाची आणि तेराव्याची सगळीकडे चर्चा होत असतानाच योगायोगाने त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी हकीमसिंग याचा मृत्यू झाला. (Ritual after death while alive) या  तेराव्या च्या जेवणाचे फोटो देखील समोर आले असून हकीमसिंग याच्या अंत्यसंकाराचे फोटो देखील सोशल मीडियावरून पहिले जात आहेत. आपल्या जिवंतपणी आपला तेरावा घातला आणि लगेच त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला याची चुटपूट मात्र अनेकांना लागून राहिली आहे.


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !