BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑक्टो, २०२२

ऊस वाहतुकीच्या मागे आता कायद्याचा ससेमिरा !

 


शोध न्यूज : साखर कारखान्यांना ऊस पोहोचाविण्याऱ्या वाहनांच्या  मागे आता कायद्याचा ससेमिरा लागला असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी २२ वाहनांवर कारवाई करीत लाखोंचा दंड आकारणी केला आहे.


ऊस दराबाबत साखर कारखाने आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष रोजचेरोज वेगळ्या वळणावर पोहोचू लागला आहे. ऊस दर संघर्ष समितीने कारखानदारीच्या विरोधात एल्गार पुकारून आपल्या काही मागण्या मांडल्या आहेत परंतु साखर कारखान्यांनी त्याची काहीच दखल घेतली नाही. दोन दिवसात पहिली उचल देण्याबाबत निर्णय न घेतल्यास ऊसाची तोड बंद पाडू असा इशारा ऊस परिषदेने दिलेला होता. त्यानुसार दोन दिवस होताच संघर्ष समितीने अनेक ठिकाणी उस तोड थांबवली आणि ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना हात जोडून विनंत्या केल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस वाहतूक बंद ठेवण्याचे कळकळीचे आवाहन देखील करण्यात आले परंतु गांधीगिरी फारशी कामाला न आल्याने उसाची वाहतूक करीत असलेल्या वाहनांचे टायर फोडण्यात आले. 

आंदोलन वेगळ्या वळणावर पोहोचू लागल्याने वाहतूक करणारे देखील काहीसे गोंधळले आणि अनेक वाहने जागेवर थांबली आहेत. यामुळे गाळप प्रक्रियेत विस्कळीतपणा आला. उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे सगळे नियम डावलून उसाची वाहतूक करीत असतात. अनेक ट्रॅक्टर चालकांकडे चालक परवाना नसतो शिवाय जवळपास सगळेच ट्रॅक्टर ओव्हरलोड वाहतूक करीत असतात. यासह अनेक नियम धाब्यावर बसवून ऊसाची वाहतूक सुरु असते. ऊस दर संघर्ष समितीने अखेर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेच लक्ष याकडे वेधले आणि नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याची आग्रही मागणी सुरु केली. अखेर काहीशी उशिरा का होईना पण उप प्रादेशिक परिवहन विभागाने आता या वाहनांवर कारवाई सुरु केली आहे त्यामुळे ऊंस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 

 सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समिती शेतकरी संघटनांनी सोलापूर आरटीओ कार्यालयास  निवेदन देऊन ओव्हरलोड ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर ट्रेलर व ट्रक तसेच इतर वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी केलेली होती.  त्याच्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन  कार्यालयाने सदर वाहनांवर कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेशीत केले आहे. त्यामुळे उप प्रादेशिक परिवहन विभागाने अशा वाहनांवर कारवाई सुरु केली असून पहिल्याच दिवशी तब्बल २२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनांकडून ३ लाख २० हजार रुपये एवढा दंड आकारला गेला आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरूच राहणार असल्याने आता मात्र ऊसाची वाहतूक करणाऱ्यांची कोंडी झाली आहे. मोठ्या प्रमाणात दंड भरण्याची वेळ या वाहनांवर येऊन ठेपली असून गांधीगिरीला न जुमानणाऱ्या वाहन चालक मालकांचे धाबे आता मात्र दणाणले आहेत. 

उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ ) विभागाचे पथक आता रोज ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून नियमभंग आढळल्यास थेट दंडात्मक कारवाई करणार आहे. ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालक आणि मालकांना आरटीओ कार्यालयाकडून आवाहन देखील करण्यात आले आहे. नोंदणीकृत क्षमतेनुसारच ऊसाची वाहतूक करावी असे आवाहन करण्यात आले आहे. (Action against vehicles transporting sugarcane beyond capacity) तसे न आढळल्यास कारवाई अटळ असून पहिल्या दिवशीच २२ वाहनांवर अशी कारवाई झाली आहे शिवाय लाखोंचा दंड आकाराला गेला आहे. वाहन मालकांना हे परवडणारे नसल्याने आता ऊसाची वाहतूक करणारी वाहने रस्स्त्यावरून कमी होताना दिसण्याची शक्यता आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !