शोध न्यूज : भीमा सहकारी साखर कारखान्याची पहिली उचल निश्चित करण्यात आली असून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची संपूर्ण पूर्तता करण्यात आली असल्याची माहिती आज भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष खा. धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सद्या साखर कारखाने आणि संघर्ष समिती यांच्यातील संघर्ष भडकताना दिसत आहे. ऊस दर संघर्ष समितीने विविध मागण्या केलेल्या असून सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पहिली उचल अडीच हजार देण्यात यावी आणि अंतिम दर हा ३ हजार १०० रुपयांचा देण्यात यावा अशी मागणी संघर्ष समितीने केलेली आहे. ऊस परिषद घेवून ही मागणी करतानाच कारखान्यांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. संघर्ष समितीच्या इशाऱ्याची कसलीही दखल साखर कारखान्यांनी घेतली नाही त्यामुळे समिती रस्त्यावर उतरली असून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचे टायर फोडण्यात आले. त्यामुळे ऊस वाहतूक विस्कळीत झाली आहे.
उस दर संघर्ष समितीच्या आवाहनाला कारखानदारीने फारसा प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आता पुढे काय होतेय हे पाहावे लागणार आहे. अशा परिस्थिती मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारीने आज आपला इरादा स्पष्ट केला आहे. यावर्षी खोडवा उसाचे प्रमाण अधिक असून थंडी देखील वाढलेली आहे. यामुळे सरासरी उतारा ११ मिळण्याची शक्यता आहे. असा उतारा मिळाला तर भीमा सहकारीची पहिली उचल प्रतिटन २ हजार ६०० रुपये राहील परंतु सद्या गाळप सुरु असलेल्या ऊसाला पहिली उचल २ हजार २०० रुपये देण्यात येईल अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष खा. धनंजय महाडिक यांनी जाहीरपणे दिली आहे.
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना महाडिक यांनी संवाद साधला आणि मते जाणून घेतली. आधीच्या निवडणुकीत देण्यात आलेल्या सर्व आश्वासनांची पूर्ती करण्यात आलेली असून याच गळीत हंगामात इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरु केले जाणार आहे, विरोधकांनी शेतकरी सभासदांचे हित लक्षात घ्यावे आणि भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन देखील महाडिक यांनी विरोधकांना केले आहे.
मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आल्याने या निवडणुकीत जाहीरनामाच असणार नाही, केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार असल्यामुळे कुठलीच अडचण येण्याचे कारण नाही. उसं उत्पादक सभासदांनी आपल्या उसाचे कुठेही वजन करावे आणि भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काट्यावर आणावे. वजनात जर फरक पडला तर एका लाखांचे बक्षीस दिले जाईल असेही महाडिक यांनी सांगून सभासदांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.
कारखान्यात केवळ पंधरा संचालकांची निवड करायची आहे त्यामुळे कुणी नाराज होऊ नये, प्रत्येकाला संधी मिळत असतेच. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणुका देखील होत आहेत त्यामुळे त्यांचा विचार नक्की होईल. थोडे थांबावे लागेल. कारखाना निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट राहणार नाही, थकीत एफआरपी, कामगारांची देयके दिली आहेत त्यामुळे सभासद आपल्यासोबत आहेत. असे सांगत त्यांनी कर्जाच्या बाबतीत देखील स्पष्टीकरण दिले आहे आणि विरोधकांना कोपरखळ्याही मारल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सद्या उसाच्या दराकडेच उस उत्पादकांचे लक्ष लागलेले असून उस दर संघर्ष समिती वरचेवर आक्रमक होत चालली आहे. (First advance of Bhima Sugar Factory confirmed) भीमा सहकारीचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी पहिली उचल देण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे त्यावर आता उस दर संघर्ष समितीची काय प्रतिक्रिया येतेय हे पाहावे लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !