सोलापूर : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता नवे सरकार येणार असून यात सोलापूर जिल्ह्याचा मंत्रीपदाचा दुष्काळ हटला जाण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार काल कोसळले आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र हळहळला असल्याचे कालपासून दिसून आले. सत्ता, सरकार, पदे ही कधीच कायमस्वरूपी राहत नसतात पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने राज्यातील सामान्य माणूस देखील हळहळला असल्याचे दिसत आहे. असा अनुभव यापूर्वी कधीही आला नव्हता त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनमानसातील स्थान दिसून आले आहे. 'सत्ता गमावली पण मने जिंकली' अशा प्रतिक्रिया ठाकरे यांच्याबाबत समाज माध्यमावर व्यक्त होऊ लागल्या आहेत. सामान्य माणूस देखील मोकळेपणे व्यक्त होताना दिसत असून येऊ घातलेल्या सरकारबाबत देखील प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
भारतीय जनता पक्ष आणि बंडखोर शिंदे गट यांच्या युतीचे सरकार स्थापन होणार आणि मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होणार हे आता स्पष्ट झालेच आहे. या नव्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्यातील काही चेहऱ्यांना संधी मिळेल अशी कुजबुज सुरु देखील झाली आहे. सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपदे मिळावीत ही मागणी कायम असते तशी आता नव्या सरकारच्या काळातही असणार आहेच. सोलापूर जिल्ह्यातील सुभाष देशमुख, विजय देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपदे मिळू शकतात तर सचिन कल्याणशेट्टी अथवा राम सातपुते याना राज्यमंत्री पदे मिळू शकतात अशी गणिते सद्या मांडली जाऊ लागली आहेत. भाजप कार्यकर्त्याना देखील तशी अपेक्षा आहे.
'डोंगार' मंत्रालयात ?
'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, समदं ओके मंदी हाय' या संवादाने राज्यभर चर्चेत असलेले सांगोला येथील आमदार शहाजीबापू पाटील याना आता बंडखोर शिंदे गटातून मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे आमदार असलेले शहाजीबापू पाटील हे बंड करून एकनाथ शिंदे गटासोबत गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांचा फोन संवाद राज्यभर व्हायरल झाला आहे. ही ऑडिओ क्लिप वायरल झाली की जाणीवपूर्वक केली गेली याबाबत देखील चर्चा आहेच पण आ. पाटील याना शिंदे गटाकडून मंत्रीपद मिळू शकते अशी चर्चा देखील आता सुरु झाली आहे.
राऊत, शिंदेही चर्चेत !
आगामी विधानसभेत जिल्ह्यात यश मिळण्यासाठी कोणता आमदार उपयुक्त ठरेल याची चाचपणी करूनच भाजप जिल्ह्यात मंत्रीपदे देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप जुन्या नेत्यांसह नव्या नावाचाही विचार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी आ. रणजितसिंह मोहिते पाटील, बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि करमाळा येथील आमदार संजय शिंदे यांच्यापैकीही वर्णी लागू शकते. एकनाथ शिंदे यांच्या गटातून एखादे मंत्रीपद सोलापूर जिल्ह्यासाठी मिळण्याची शक्यता आहे. (Solapur district eager for ministerial post)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !