सांगोला : हॉटेलच्या थकीत बिलासाठी काल झालेल्या घटनेच्या मागे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा हात असून पवार कुटुंबियाकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा मोठा आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
सांगोला तालुक्यातील मांजरी येथील अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना अडवत २०१४ सालच्या हॉटेलच्या थकीत बिलाची मागणी केली. आधी हॉटेलचे बिल द्या आणि मगच पुढच्या कार्यक्रमाला जावा असे शिनगारे यांनी सुनावले होते. सांगोला पंचायत समिती आवारात या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. पंचायत राज समितीचे एक पथक काल सांगोल्यात आले होते. आमदार अनिल पाटील, आ. किशोर दराडे, आ. डॉ. देवराव होळी, यांच्यासमवेत सदाभाऊ खोत हे देखील होते. या पथकाने महूद येथील ग्रामपंचायतीची पाहणी केली आणि ते सांगोला पंचायत समितीच्या कार्यालयाकडे आले. पंचायत समितीच्या आवारात प्रथम सदाभाऊ खोत यांची गाडी आली आणि खोत गाडीतून खाली उतरले. याचवेळी सांगोला तालुक्यातील मांजरी येथील हॉटेल मालक आणि शेतकरी संघटनेचे तत्कालीन पदाधिकारी असलेले अशोक शिनगारे हे सदाभाऊ यांच्याकडे गेले आणि त्यांनी हॉटेलचे जुने बिल मागितले.
"सदाभाऊ, तालुक्यात तुमचे स्वागत आहे पण २०१४ सालच्या निवडणुकीतील माझी हॉटेलची उधारी तेवढी द्या, आणि मगच पुढच्या कार्यक्रमासाठी जा ...तुम्ही आमचा फोन घेत नाही आणि कधी घेतलाच तर व्यवस्थित बोलतसुद्धा नाही " असे अशोक शिनगारे सदाभाऊ खोत यांना म्हणाले होते. या घटनेने मोठा गदारोळ उडाला होता आणि सदाभाऊ खोत यांनी आपण शिनगारे यांना ओळखत देखील नसल्याचे म्हटले होते. दरम्यान काल रात्री सांगोला पोलीस ठाण्यात अशोक शिनगारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पण या घटनेवरून सदाभाऊ यांनी थेट राष्ट्रवादीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. (Sadabhau Khot's allegation against NCP)
अशोक शिनगारे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचे खोत यांनी काल म्हटले होते परंतु आज त्यांनी थेट पवार कुटुंबावरच मोठे आरोप केले आहेत. हॉटेलचे बिल मागण्याचा प्रकार करणारे अशोक शिनगारे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या सर्व घटनेत राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा हात असून राष्ट्रवादीसह पवार कुटुंबीयाकडून आपल्या जीवाला धोका आहे. याबाबत आपण विरोधी पक्षानेत्यांकडे देखील तक्रार करणार आहोत. बिल मागण्याचा प्रकार घडवायचा आणि त्याचे चित्रीकरण करून ते व्हायरल करून मला जीवनातून उठवायचे असा हा प्रयत्न होता असे देखील सदाभाऊ यांनी म्हटले आहे.
सदर घटनेबाबत सांगोला पोलिसांवर देखील खोत यांनी आरोप केला असून पोलिसांवर कुणाचा दबाव होता ? असा सवाल त्यांनी केला आहे. पोलीस गुन्हा दाखल करायला तयार नव्हते, "तो माफी मागतोय, कशाला गुन्हा दाखल करायचा "? असे पोलीस म्हणत होते. अखेर गुन्हा दाखल केला परंतु आवश्यक होती अशी कलमे लावली गेली नाहीत असा आरोप देखील खोत यांनी केला आहे. काल रात्री पोलीस अधिकाऱ्यांना कुणाकुणाचे फोन गेले आहेत याची माहिती देखील घेतली गेली पाहिजे, त्यांच्यावर कुणाचा दबाव होता हे पाहणे आवश्यक आहे असे देखील खोत म्हणाले.
गुन्ह्याची यादी वाचली
सदाभाऊ यांना हॉटेलचे जुने बिल मागणारे अशोक शिनगारे हे कसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत हे सांगत सदाभाऊ खोत यांनी शिनगारे यांच्यावर असलेले गुन्हे वाचून दाखवले. शिवाय या घटनेमागे राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
टोमॅटोसारखे गाल असलेल्या --
सांगोल्यात घडलेल्या घटनेबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी केलेले विधान सोलापूर जिल्ह्यात अधिक चर्चेचे ठरण्याची शक्यता आहे. सदर घटनेबाबत बोलताना खोत म्हणाले, "टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या एका नेत्याचे हे षडयंत्र आहे. त्यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख कुणाकडे आहे याचा अंदाज अनेकांना आला आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
हॉटेल मालकाने अडवून बिल मागितल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अत्यंत तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करीत अत्यंत कडक शब्दात आणि तीव्र शब्दात अनेकांनी खरपूस समाचार घेतला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !