मुंबई : राज्यात कोरोनाची वाढ झपाट्याने सुरूच असून मागील २४ तासात राज्यात झालेली रुग्णांची वाढ ही चिंताजनक असून दररोजच्या वाढीचा वेग हा आदल्या दिवसांपेक्षा अधिक होताना दिसत आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले असून मुबई परिसरात तर उद्रेक होऊ लागला आहे तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्याही वाढती असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येऊ लागले आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली आणि सगळेच बेफिकीर झाले, कोरोना पूर्णपणे निघून गेला आणि आता त्याचा कसलाही धोका नाही, तो पुन्हा येणारच नाही अशा अविर्भावात नागरिक समाजात वावरत आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाही नागरिकांनी त्याकडे गंभीरपणे पहिले नाही. जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट येवू शकते असे तज्ञ सांगत राहिले पंरतु बहुसंख्य नागरिकांनी हे गंभीरपणे घेतले नसल्याचे दिसून येत आहे. जून महिन्याच्या आधीच राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येऊ लागले आणि जून महिन्याच्या सुरुवातीपासून या रुग्णवाढीला वेग आला आहे. दररोजची ही वाढ कालच्यापेक्षा अधिक दिसून येत आहे.
मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरातील परिस्थिती लक्षात घेतली तर चिंता निर्माण करणारी परिस्थिती पुन्हा तयार झाली आहे. राज्यात मागील २४ तासात ४ हजार २५५ एवढ्या नव्या रुग्णांची वाढ झाली आहे तर ३ कोरोनाबाधीतांचा मृत्यू देखील झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे २ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.८७ टक्के असले तरी राज्यात कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढताना दिसत आहे ही चिंताजनक बाब आहे. (Rapid growth of corona patients in Maharashtra)
कोरोना रुग्णांत होत असलेली वाढ ही राज्यभर असली तरी मुंबई विभागात सर्वाधिक वाढ होत आहे. मागील चोवीस तासात वाढलेल्या ४ हजार २५५ रुग्णांपैकी ३ हजार ७१८ रुग्ण हे केवळ मुंबई विभागातील आहेत. मुंबई विभागात मुंबई महापालिका, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई - विरार, रायगड पनवेल या महापालिकांचे क्षेत्र समाविष्ट आहे.
राज्यातील वाढ !
पुणे विभागात सोलापूर शहर, ग्रामीण, पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्र, सातारा शहर व जिल्हा अशा क्षेत्रांचा समावेश असून या विभागात तब्बल ३४० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. नाशिक विभागात ४१, कोल्हापूर विभागात २५, औरंगाबाद विभागात २१, अकोला विभागात १७, नागपूर विभागात ८२ अशा नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातही वाढ
सोलापूर शहर आणि जिल्यात देखील कोरोनाच्या नव्या रुग्णांची वाढ आढळून येत आहे. कालच्या अहवालानुसार ३४४ चाचणीत सोलापूर शहरात २ नवे रुग्ण आढळले असून ११ सक्रीय रुग्ण आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात झालेल्या ९० चाचणीत एकही नवा रुग्ण आढळलेला नसून ७ सक्रीय रुग्ण आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !