BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मे, २०२२

वाळू ठेकेदाराचा राडा, शेतकऱ्याला मारहाण !

 


मोहोळ : वाळू तस्करांची मुजोरी अनेकदा समोर येत असतानाच मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील शेतकऱ्यास वाळू ठेकेदाराने मारहाण केल्याची तक्रार कामती पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. 


वाळू चोरीवर नियंत्रण आणण्याचा प्रशासन कितीही दावा करीत असले तरी प्रत्यक्षात विविध ठिकाणी वाळू चोरी होत असल्याचे दिसते आणि आणि चोरीच्या वाळूवर मिळविलेल्या प्रचंड पैशावर वाढलेली दादागिरी देखील पाहायला मिळत असते. आजवर वाळू तस्करांनी अनेक शेतकऱ्यावर हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आज मात्र वाळूचा ठेका घेतलेल्या ठेकेदारानेच शेतकऱ्याला माराहाण केल्याची फिर्याद संबंधित शेतकऱ्याने पोलिसात दिली असून परिसरातील शेतकऱ्यात या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. शेतकरी काहीसे धास्तावले असल्याचेही सांगण्यात येऊ लागले आहे. त्यात मोहोळ तालुक्यात देखील वाळू चोरांचा सुळसुळाट झालेला असल्याने या घटनेची तीव्रता अधिक वाढीस लागत आहे.

 
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील शेतकरी विनोद विश्वनाथ पाटील यांची भीमा नदीच्या काठावरच शेती आहे त्यामुळे ते आपल्या शेतात सायंकाळच्या वेळेस गेलेले होते. भीमा नदीच्या पात्रातील मोटारीचा पाईप जोडण्यासाठी ते गेलेले असताना ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शेतकरी विनोद पाटील हे भास्कर पांडुरंग पाटील, दीपक औदुंबर पाटील, अभिषेक अप्पासाहेब पाटील हे बेगमपूर येथील सहकारी घेवून ते पाईप जोडण्याच्या कामासाठी गेले होते आणि पाईप जोडत असताना वाळू ठेकेदार नागेश ताकमोगे (सोलापूर), दत्तात्रय गणपत चव्हाण (बेगमपूर), महावीर कदम ( बार्शी) आणि इतर पन्नास ते साठ अनोळखी लोक तेथे आले. यावेळी येथील दत्तात्रय चव्हाण यांनी 'आम्ही वाळूचा ठेका घेतला आहे, तुमचा नदीत येण्याचा काही संबंध नाही' अशा भाषेत धमकावले. त्यानंतर 'आम्ही मोटारीचा पाईप जोडण्यासाठी आलो आहोत' असे सांगत असताना त्यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करण्यात आली.

 
सदर भांडण सोडविण्यासाठी म्हणून केशव बाबासाहेब पाटील हे पुढे झाले असता त्यानाही धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांच्या मोटार सायकलची तोडफोड करण्यात आली अशा आशयाची फिर्याद शेतकरी विनोद पाटील यांनी कामती पोलिसात दिली आहे. कामती पोलीस सदर प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (Sand contractor beats farmer) या घटनेची चर्चा परिसरात होत असून नदीकाठावरील शेतकऱ्यात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


हे देखील वाचा :>

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !