BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ मे, २०२२

उजनीच्या पाण्यासाठी 'स्वाभिमानी' ने रोखला रस्ता !

 



पंढरपूर :  पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetakari Sanghatana) आज रस्ता रोको आंदोलन केले आणि काही झाले तरी उजनीच्या थेंबाला धक्का लावू देणार नसल्याचा इशारा दिला. 


मागील वर्षी उजनीचे पाणी असेच सोलापूर जिल्ह्यात पेटले होते आणि त्यानंतर आता इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा योजनेसाठी उजनीतील पाणी नेण्याचा विषय जिल्ह्यात वादाचा ठरला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचा एक थेंब देखील इंदापूर तालुक्यात नेला जाणार नाही असे पालकमंत्री वारंवार सांगत राहिले आहेत पण सोलापूर जिल्ह्यात शेतकरी, शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत तर या विषयावर काही आजी माजी लोकप्रतिनिधी देखील बोलत आणि इशारे देत राहिलेले आहेत. पूर्वी ठरल्याप्रमाणेच पाण्याचे नियोजन सुरु असून आत्तापर्यंत लवादाने ठरवून दिल्याप्रमाणेच पाण्याचे वाटप होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. 


पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेच सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी पळवून नेत असल्याचा आरोप सोलापूर जिल्ह्यात होत असताना शेतकरी संघटना आक्रमक होत आहेत. स्वबिमानी शेतकरी संघटनेने तालुकाध्यक्षसचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूर - मंगळवेढा मार्गावर अनवली चौकात अत्यंत आक्रमकपणे रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास दोन तास हे आंदोलन सुरु होते आणि शेतकरी देखील प्रचंड आक्रमक झालेले दिसत होते. या आंदोलनामुळे सदर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती आणि  दोन्ही बाजूनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. (Road block movement for Ujjain water) यावेळी आंदोलकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. 


इंदापूरला पाणी देण्यास विरोध 

इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी उजनीतील पाणी  देण्यास यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रखर विरोध केला आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पालकाची भूमिका स्वीकारावी असे आवाहन करण्यात आले. काही झाले तरी उजनीचे पाणी इंदापूर तालुक्यात लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेस जाऊ दिले जाणार नाही असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळी व्यक्त केला. 


-- तर बारामतीत आंदोलन !

इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी येथील उपसा सिंचन योजना रद्द करा अन्यथा बारामतीच्या दारात आंदोलन करू, हे आंदोलन मंत्रालयापर्यंत घेवून येऊ असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी दिला. कडक उन्हात शेतकरी दोन तास रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.  


-- तर रक्ताचे पाट वाहतील !

आमच्या हक्कावर कुणी गदा आणीत असेल आणि आमचे पाणी चोरून आमचा भविष्यकाळ उध्वस्त करण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, रक्ताचे पाट वाहतील पण उजनीच्या पाण्याचा एक थेंबही इंदापूर, बारामतीला जाऊ देणार नाही असा इशारा सचिन पाटील यांनी यावेळी दिला. 


हे जरूर वाचा : >>> 

खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा ! 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !