BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ मे, २०२२

वीज पडण्याआधी मिळणार आता सूचना !

 


आकाशातून जमिनीवर वीज कोसळण्याच्या आधी पंधरा मिनिटे सूचना मिळणार असून 'दामिनी' ऍप मदत करणार आहे. पावसाळ्यात बाहेर असणाऱ्या तसेच शेतीत काम करणाऱ्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 


दरवर्षी पावसाळ्यात आणि अवकाळी पावसाच्या वेळीदेखील वीज पडून प्रचंड नुकसान होण्याच्या घटना घडत असतात. वीज पडून जीवितहानी होते आणि पाळीव पशु देखील मृत्युमुखी पडतात. काही ठिकाणी आग लागल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. शेतात शेतकरी राबत असतो आणि पावसाळ्याच्या दिवसात तर त्याला शेतात काम करणे अपरिहार्य ठरत असते. आकाशात विजांचा कडकडाट होत असतो, मेघगर्जना होत असतात आणि अचानक मोठा आवाज करीत कुठेतरी वीज कोसळत असते. वीज कधी आणि कुठे पडणार याचा काहीच अंदाज नसतो आणि त्यामुळे कोणत्याही भागात हा धोका सतत असतो. वीज कोसळण्याची सूचना आधीच मिळाली तर सावधगिरी बाळगता येते. भारत सरकारच्या दामिनी ऍप ने हीच सुविधा आता दिली आहे. 


जून, जुलै आणि सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात वीज पडण्याचा आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो, हा धोका टाळण्यासाठी भारत सरकारच्या दामिनी ऍपच्या माध्यमातून वीज पडण्याची पूर्वसूचना मिळणार आहे. आकाशातून वीज कोसळणार असल्याची माहिती आधीच पंधरा मिनिटे मिळू शकणार आहे. या सूचनेमुळे आधीच संकटाची चाहूल लागत असून यामुळे होणारी जीवितहानी टाळता येणार आहे. जेथे वीज पडणार आहे ते ठिकाण आणि तो २० ते ४० किमी अंतराचा परिसर या ऍप वर दाखवला जाणार आहे. शिवाय या ऍपवर 'बिजली की चेतावनी है' अथवा बिजली की चेतावनी नही है' असे संदेश देखील दिले जाणार आहेत. (Notice  will be given before lightning strikes by Damini App) दर पाच मिनिटाला यावरील माहिती अपडेट होणार आहे. 


जीवितहानी टाळता येईल 

वीज पडणार असल्याची आधी माहिती मिळाली तरी कोसळणारी वीज थांबवता येणार नाही परंतु त्यामुळे होणारी जीवितहानी मात्र नक्की टाळता येणार आहे. पंधरा मिनिटे आधीच माहिती मिळणार असल्यामुळे येणाऱ्या संकटाची माहिती आधीच मिळाल्याने त्वरित सावधगिरी बाळगणे सोपे जाणार आहे. या माहितीमुळे वीज पडण्यापासून होणारे मृत्यू निश्चित थांबू शकणार आहेत. 


प्रशासनाला सूचना !

सादर ऍप वापरण्याबाबत प्रशासकीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. संकटाची सूचना आधीच मिळणार असल्यामुळे  जीवितहानी आणि वित्तहानी वाचविण्यासाठी हे ऍप अत्यंत उपयोगाचे ठरणार आहे. पंधरा मिनिटे आधीच संकटाची सूचना मिळणार असल्याने दक्षता घेण्यास पंधरा मिनिटांचा कालावधी मिळत आहे. 


जीपीएस लोकेशनने काम 

सदर ऍप जीपीएस लोकेशनने काम करणार असल्याने अचूक माहिती मिळणार असून प्रशासकीय यंत्रणेला देखील वेळीच संकटाची महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे. भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाच्या वतीने हे ऍप तयार करण्यात आले आहे आणि हे दामिनी ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सदर ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून संकटाची माहिती आधीच घेता येणार आहे.     


हे जरूर वाचा : >>> 

खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !