BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ मे, २०२२

लग्नाच्या जेवणातच विषबाधा, वऱ्हाडी मंडळी हैराण !



लातूर : लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्यामुळे वऱ्हाडी मंडळीना हे जेवण भलतेच महागात पडले आहे. कडाक्याच्या उन्हात लग्नाच्या पंगती बसल्या आणि वऱ्हाडी मंडळींना घरी गेल्यावर घडलेल्या प्रकारची जाणीव झाली. 


लग्नाचे जेवण अथवा अन्य सार्वजनिक जेवणावळीच्या ठिकाणी यापूर्वी देखील अशा विषबाधा होण्याच्या घटना घडल्या आहेत पंरतु लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींची संख्या मोठी असते त्यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात येत असतात. विवाहाचे जेवण बनविण्यासाठी कुणालातरी ऑर्डर दिली जाते आणि या कामगार अथवा मालकाकडून थोडेसे दुर्लक्ष झाले तरी मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता असते. सद्या विवाह सोहळ्याचे दिवस असून दुसरीकडे उन्हाचा कडाका देखील आहे. वाढत्या उन्हामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होता असतानाच लग्नाच्या जेवणावळीतून विषबाधा होण्याची घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केदारपूर गावात घडली आहे. (Poisoning from the wedding meal) विषबाधा झालेल्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. 


केदारपूर येथे एका विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यास शेकडो वऱ्हाडी उपस्थित होते. दुपारच्या दरम्यान विवाह सोहळा संपन्न झाला आणि कडक ऊन असतानाच लग्नाच्या जेवणाच्या पंगती बसू लागल्या. लग्नातील मिष्टान्न भोजनावर वऱ्हाडी मंडळीनी ताव मारला आणि लग्नाला आलेले पाहुणे आपापल्या घरी पोहोचले. रात्रीच्या वेळी मात्र एकेका पाहुण्याला त्रास होऊ लागला. उलट्या, जुलाब आणि मळमळ असा त्रास जाणवू लागला. केदारपूर येथील वाढू आणि जवळगा साकोळा येथील वर यांचा विवाह असल्याने दोन्ही गावाचे लोक तसेच इतर गावाचे पाहुणे या विवाहाला उपस्थित होते त्यामुळे विषबाधेची व्याप्ती देखील मोठी आहे. केदारपूर, काटेजवळगा, जवळगा, अंबुलगा बुद्रुक, सिंदखेड अशा अनेक गावातील वऱ्हाड लग्नाला आले होते आणि या सर्वानीच लग्नातील जेवण केले होते. एकसारख्या रुग्णांची संख्या वाढू लागली आणि प्रत्येक रुग्णाने दुपारी लग्नात जेवण केल्याची माहिती समोर आली त्यामुळे लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाली असल्याचे प्रकरण समोर आले. 


जेवणानंतर पोटदुखी 

लग्नात जेवण केल्यानंतर अनेकांना पोट दुखण्याचा त्रास झाला उलटी, जुलाब आणि मळमळ असा त्रासही होत राहिला परंतु ज्यांनी लग्नात वरण भात खाल्ला होता त्यांनाच अधिक त्रास जाणवत असल्याची माहिती देखील पुढे आली आहे. भातावर वरण घेतलेल्या वऱ्हाडी मंडळीना हा त्रास झाल्याने वरणातून देखील विषबाधा झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


शेकडो लोकांना त्रास 

विवाहास मोठी गर्दी झाली होती आणि जेवणाच्या पंगती देखील गजबजल्या होत्या. नंतर त्रास होईल तसे या व्यक्ती रुग्णालय गाठत राहिले. हळूहळू ही संख्या वाढत गेली असून विविध ठिकाणी रुग्णावर उपचार सुरु करण्यात आले. काहीना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही की कुणाचीही प्रकृती चिंताजनक बनलेली नाही.



हे जरूर वाचा : >>> 

खालील बातमीला टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !  


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !