सोलापूर : लाभक्षेत्रातील शेतीसाठी उजनी धरणातून आज ५ एप्रिल रोजी कालव्यातून पाणी सोडले जाणार असून सहा टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन (Ujani Dam) करण्यात आले आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शेतीसाठी पाण्याचीही मागणी वाढू लागली आहे. जलसंपदा विभागाकडून पाणी मागणी अर्ज भरून देण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून वेळोवेळी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी अर्जाचे आवाहन करण्यात येत असते. पावसाळ्यात राज्यभर चांगला पाऊस झालेला असून सर्वत्र चांगला पाणीसाठा आहे. उन्हाळा सुरु होऊन मार्च महिना संपत आला तरी धरणात मुबलक पाणी साठा असल्यामुळे यावर्षी पाण्याची टंचाई जाणवणार नसून शेतीलाही पुरेसे पाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांची देखील पाण्याची मागणी होत असून त्यानुसार आज ५ एप्रिल रोजी उजनीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
आजपासून उजनी धरणातून शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असून ५ मे पर्यंत म्हणजे संपूर्ण महिनाभर पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे. या काळात सहा टीएमसी पाणी कालव्यातून सोडले जाणार आहे. उजनी धरणाच्या क्षेत्रात चांगला पाउस झाल्याने यावर्षी उजनी धरण १२० टक्के एवढे भरले गेले होते. मार्च संपत आला तरी उजनी धरणाची पाणी पातळी चांगली असून शेतीसाठी मागच्याच महिन्यात उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. आता उन्हाळी आवर्तनसुरु केले जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उजनी धरणात समाधानकारक पाणी साठा आहे. (Water will be released from Ujani dam for agriculture) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातून उन्हाळी आवर्तन देण्याचा निर्णय झाला आहे त्यानुसार हे पाणी सोडण्यात येणार आहे.
वसुली नाही !उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेली आहे पण शेतकरी बांधवाकडून अपेक्षित वसुली होत नाही. नगरपालिका, साखर कारखाने यांच्याकडील वसुली उद्दिष्टापेक्षा अधिक झाली असून शेतकऱ्याकडील सिंचन वसुली केवळ २० ते २५ टक्क्यावरच आहे. अपेक्षेपेक्षा अधिक वसुली देणाऱ्या बिगरसिंचन संस्थाकडे पाणीवाटपाचा कल झुकण्याआधीच शेतकरी बांधवानी वेळीच जागे व्हावे ! आजोबाने पाणीअर्ज दिला नाही म्हणून आमचे पाणी गेले असे भविष्यात नातवांनी म्हणू नये याची काळजी घेणे आजच महत्वाचे आहे.सिद्धेश्वर काळुंगेउप विभागीय अधिकारीउजनी कालवा उप विभाग क्र. ५२ मंगळवेढा
धरणात पुरेसे पाणी
उन्हाळा सुरु झाला असला आणि उन्हाची वाढती तीव्रता असली तरीही उजनी धरणात सद्या ९७.७२ टीएमसी एवढा पाणीसाठा असून ३४.०६ टीएमसी एवढा उपयुक्त साठा आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाउस झालेला असल्यामुळे धरणात यावर्षी चांगला पाणी साठा आहे त्यामुळे यावर्षीच्या कडक उन्हाळ्यात देखील पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली नाही. याचा लाभ सोलापूरसह नगर आणि पुणे जिल्ह्यांनाही होणार आहे.
आवर्तन महिनाभर !
उजनी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडले जाणाऱ्या पाण्याचे आवर्तन एक महिना सुरु राहणार असून टप्प्याटप्प्याने वाढवत हे पाणी जवळपास ३ हजार २०० क्युसेक्स पर्यंत वाढवले जाणार आहे. उन्हाळा अधिकच कडक आणि तीव्र असल्याने पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. उष्णता वाढत असताना उजनीच्या पाण्यामुळे आता पिकांची तहान भागणार आहे.
हे देखील वाचा : >>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !