BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० सप्टें, २०२३

सप्टेंबर महिन्यात पाऊस धो धो बरसणार !

 


शोध न्यूज : पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर धरणात पाण्याचा साठा वाढू लगला असतानाच, राज्यात पाऊस आणखी धो धो  कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने बळीराजा सुखावला आहे. 


यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस रुसलेला होता आणि पावसाळा संपत आला तरी त्याचा  रुसवा जाताना दिसत नव्हता त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत होते तर पिण्याच्या पाण्याची टंचाई ऐन पावसाळ्यात निर्माण होऊ लागली होती. हवामान विभाग अंदाज देत राहिले पण पावसाने दडी मारून हे अंदाज सतत चुकविण्याचे काम केले. त्यामुळे हवामानाचा नवा अंदाज आला तरीही त्यावर कुणाचा विश्वास बसायला तयार नव्हता. अखेर सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा हजेरी लावायला सुरुवात केली असून राज्यात विविध ठिकाणी, हा पाऊस मुसळधार कोसळत आहे. अर्थातच त्यामुळे पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या असून दुष्काळाचे संकट टळणार असल्याचे चित्र सद्या तरी निर्माण झाले आहे. त्यातच हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात सतत पाउस कोसळेल असा अंदाज व्यक्त केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जर पाऊस कोसळला तर राज्यावर येऊ पाहत असलेले दुष्काळाचे संकट दूर होणार आहे. 


राज्यात सद्या पावसाची हजेरी लागत असून पुणे परिसरात होत असलेल्या पावसामुळे, धरणांची परिस्थिती चांगली झाली आहे. धरणातून विसर्ग सोडला जात असल्यामुळे उजनी धरणात देखील पाणी येवू लागले आहे.  हळूहळू का होईना पण उजनी धरणातील जलसंचय वाढू लागला आहे, पुणे परिसरात असाच पाउस सुरु राहिला तर उजनीची परिस्थिती समाधानकारक होऊ शकते. येत्या १४ तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला चांगली सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहेच पण १६ ते २० सप्टेंबर या कालावधीत राज्यात मुसळधार पाउस होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी तर अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.  महाराष्ट्रात १३ सप्टेंबर पासूनच पाऊस विदर्भात हजेरी लावणार आहे तर १४ सप्टेंबर रोजी पश्चिम विदास्र्भात आणि त्यानंतर १५ तारखेपासून उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस येणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्यामुळे आणि मुसळधार पाऊस होणार असल्यामुळे धरणांच्या पातळीत मोठी वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, १६ ते २० तारखेच्या दरम्यान होणारा पाऊस सगळीकडेच होणार असून, कुठलाही भाग पावसापासून वंचित राहणार नसल्याचे म्हटले आहे 


राज्यातील अनेक धरणातून आत्ताच विसर्ग सोडला जाऊ लागला आहे, धरणातील पाणीसाठी वाढला असून आणखी पाऊस झाल्यानंतर ही धरणे ओव्हरफ्लो होणार आहेत. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.  पुणे, मावळ परिसरात झालेल्या चांगल्या पावसाने पुणे परिसरातील धरणात जलसाठा झाला आहे, उजनी धरणाच्या वरील बाजूला असलेल्या बहुतेक सर्व धरणांची परिस्थिती समाधानकारक बनली आहे, त्यामुळे उजनी धरणाची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. पुणे जिल्ह्यातील चासकमान धरण पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे भीमा नदीमध्ये आठ हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी अधिक होत राहणार आहेच, या विसर्गामुळे  भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. (Satisfactory rainfall in Maharashtra in the month of September) धरण क्षेत्रात पाऊस सुरु असल्यामुळे आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे येऊ घातलेला दुष्काळ टळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !