BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ नोव्हें, २०२३

'तो' परत आलाय ..! दिवाळीआधीच महाराष्ट्रात अवकाळी पाऊस !

 


शोध न्यूज : हिवाळा सुरु झाला असताना आणि पावसाळ्यात गायब असलेला पाऊस आता पुन्हा परत येत असून दिवाळीच्या आधीच राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


पावसाळ्यात दडी मारलेला मोसमी पाऊस परत गेला असला आणि हिवाळा सुरु झाला असला तरी अवकाळी पावसाने राज्यात पुन्हा प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. संपूर्ण पावसाळ्यात शेतकरी मोठ्या आशेने आभाळाकडे पहात राहिला, मान्सूनचा पाऊस परत गेला पण तो बरसलाच नाही, यामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आले असून, पुढील पावसाळ्यापर्यंत मोठ्या टंचाईचा सामना करावा लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. ऐन पावसाळ्यात अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, त्यामुळे येत्या उन्हाळ्यात बिकट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जाऊ लागला आहे. 


थंडीचे दिवस सुरु झाले असून खरीप पिके काढणीला आलेली आहेत, त्याचवेळी अवकाळीची हजेरी लागू लागली आहे. आज पहाटेपासूनच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे तर अन्य काही भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे. आकाश पूर्ण ढगाळ असून रिमझिम पाऊस बरसू लागला आहे.(Unseasonal rain in Maharashtra before Diwali)  अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पहाटेच पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. खरीप पिकांची काळजी घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेताकडे धावले असल्याचे दिसून आले. येत्या २४ तासांत आणखी अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून यामुळे वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून हा पाऊस होत आहे. आगामी चोवीस तासात देखील राज्यातील अनेक भागात हा पाउस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तामिळनाडू आणि केरळ राज्यात पाउस होत असून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात येत्या दोन तीन दिवसात हलका पाउस होण्याची शक्यता हवामान विभागाने  व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे.  येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान ढगाळ राहणार असून सिंदुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी प्रमाणात जाणवेल असे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !