BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ नोव्हें, २०२३

ग्रामपंचायत निवडणूक : दोन गटात तुफान राडा, पोलीस पाटलालाही मारले




शोध न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आपसातले मतभेद वेगळ्या वळणावर गेले असून दोन गटात तुफानी राडा झाल्याने समोर आले आहे. निवडून आल्यानंतर देवदर्शनासाठी निघालेल्या विजयी उमेदवारावर जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. 


निवडणूक म्हटलं की दोन किंवा अधिक गट दिसत असतात आणि काही कार्यकर्ते हुल्लडबाज देखील असतात. चार दिवसांच्या निवडणुकीसाठी आयुष्यभाराची दुष्मनी घेतली जाते, नेते एकत्र येतात पण गाव पातळीवरील संघर्ष भडकत राहतो, कित्येक तरुणांवर गुन्हे दाखल होतात आणि पुढील कित्येक वर्षे त्यातच अडकून पडतात. या गुन्ह्यात शिक्षा झाली तर मात्र तरुणाचे आयुष्य बरबाद होते. तरीही कुठल्यातरी नेत्यासाठी तरुण हातात दगड, काठ्या घेतात आणि रस्त्यावर उतरत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत देखील, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर मोठा राडा झाल्याचे समोर आले आणि जवळपास ८० - ९० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन गट परस्परात भिडल्यामुळे दोन्ही गटावर हे गुन्हे दाखल झाले आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुणी जल्लोष केला होता तर कुणाला हा निकाल पचवत आलेला नव्हता. नंतर मात्र हा राडा झाला आहे. 


बारामतीमधील सायंबाचीवाडी या गावातील विकास सोसायटीच्या निवडणूकीचा वाद अलीकडेच शमला आहे, तेवढ्यात नवे प्रकरण घडले आहे.  सायंबाचीवाडी येथे  ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर जोरदार धुमश्चक्री झाली. यात दोन गट एकमेकांना भिडले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. या घटनेत वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. उद्योजक दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील श्री. स्वयंभू परिवर्तन पॅनेल आणि डी. पी. जगताप यांच्या नेतृत्वाखालील श्री. स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास पॅनेल यांच्यात चुरशीची निवडणूक झाली. ग्रामपंचायत निवडणूक ही मोठी चुरशीचीच होत असते पण येथील चुरस काही वेगळी होती, स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास  या पॅनेलचे पाच सदस्य निवडून आले आहेत. दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखालील या  पॅनेलने दोन सदस्यांसह सरपंचपदाची जागा जिंकली. निवडणुकीत विजय संपादन केल्यावर विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते यांनी जोरदार जल्लोष करीत आपला आनंद देखील साजरा केला. 


निवडणूक निकाल लागल्यानंतर विजयी गटाचे विजयी उमेदवार देवाचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते त्याच वेळी ही घटना घडली. श्री स्वयंभू हिराबाई माता ग्रामविकास पॅनल आणि श्री स्वयंभू परिवर्तन पॅनल यांचे कार्यकर्ते देवाच्या दर्शनाच्या निमित्ताने आमने सामने आले, यावेळी बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान पुढे दगडफेकीत झाले, देवदर्शन बाजूला राहिले आणि दोन्ही गटात तुफान राडा सुरु झाला. याची माहिती पोलीस ठाण्यात पोहोचताच, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. यावेळी दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध तक्रारी केल्या.  पोलिसांनी परिस्थिती हाताळली आणि त्यानंतर हा राडा काहीसा शमला.


पोलीस पाटलानाही मारहाण 

गावात दोन गटात जोरदार राडा सुरु झाल्याने गावचे पोलीस पाटील गोविंद जगताप हे मध्ये पडले, दोन्ही गटांना ते भांडण करण्यापासून परावृत्त करीत होते, दोन्ही बाजूना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. पण याचवेळी दुर्योधन जगताप यांनी, पोलीस पाटील जगताप यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस पाटील गोविंद जगताप यांना तोंडात मारून खाली पाडले आणि ते खाली पडल्यावर त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. अशा प्रकारची तक्रार पोलीस पाटील जगताप यांनीच पोलिसात दिली आहे, त्यामुळे भापकर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


दोन गटात हाणामारी होऊन झालेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन्हीही गटातील लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल कमी करण्यात आला आहे. (Gram Panchayat Elections: Fierce fights)या घटनेत वाहनांचेही नुकसान करण्यात आले आहे त्यामुळे बेकायदेशीर जमाव जमवून, दगडाने हाणामारी केल्याच्या प्रकरणी ९६ लोकांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !