BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ एप्रि, २०२२

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीत करूणा मुंडे यांना मिळाली १३३ मते !


कोल्हापूर : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात अनेक तक्रारी आणि आरोप केलेल्या करुणा मुंडे यांना कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीत केवळ १३३ मते मिळाली आहेत. मुंडे यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.


कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोट निवडणूक विविध कारणांनी चर्चेत राहिली तशी करुणा मुंडे यांची उमेदवारी देखील चर्चेत आली. करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील आघाडीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप केले होते त्यामुळे त्या राज्यात अधिक प्रसिद्धीला आल्या होत्या. अलीकडेच त्यांच्यावर एक गुन्हा देखील दाखल झाला होता त्यावेळी सुद्धा त्यांची चर्चा राज्यभर झाली होती. त्यानंतर त्यांनी शिवशक्ती सेना नावाच्या राजकीय पक्षाची घोषणा केली होती. गरीबावरील अन्याय दूर करणे, महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणे हा आपल्या पक्षाचा उद्देश असल्याचे सांगत वेळ पडली तर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या मतदार संघात धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील निवडणूक लढविण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही असे त्यांनी सांगितले होते.


करूणा मुंडे यांनी कोल्हापूर उत्तर मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर याची बरीच चर्चा झाली होती. या पोट निवडणुकीत पंधरा उमेदवारांनी सहभाग घेतला यात करुणा मुंडे यांचाही समावेश होता. अखेर आज या निवडणुकीची मतमोजणी झाली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (काँग्रेस) यांचा दणदणीत विजय नोंदला गेला. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला. त्यामुळे या निवडणुकीची चर्चा होत असतानाच करुणा मुंडे यांना मिळालेल्या मतांची देखील चर्चा होऊ लागली आहे. त्यांना या निवडणुकीत केवळ १३३ मते मिळाली आहेत. 


जनतेचा आवाज !

राज्यातील १३ कोटी जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची आपली इच्छा असून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर आपला भर असणार आहे असे सांगत करुणा मुंडे यांनी निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत १ लाख ६५ हजार मतदाराहून अधिक मतदारांनी मतदान केले आणि विजयी उमेदवार जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मते मिळाली. मुंडे यांना केवळ १३३ वर समाधान मानावे लागले आणि त्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले. 


निवडणूक रद्द करा !

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील या पोटनिवडणुकीत निवडणूक आचार संहितेचा भंग झाला असल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला असून निवडणूक रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असे देखील मुंडे यांनी सांगितले आहे. 


माझा विजय झाला !

आपल्याला शंभरपेक्षा अधिक मते (१३३) मिळाली याचा  आपणास आनंद आहे, आपल्या गाडीवर हल्ला करण्यात आला, प्रचारापासून रोखण्यात आले या कारणामुळे आपणास कमी मते मिळाली आहेत. हारकर जितनेवालो को बाजीगर कहते है... झाशीची राणी लक्ष्मीबाई याना सुद्धा पराभवाला सामोरे जावे लागले होते. यापुढे देखील असेच लढत राहू, आपण केवळ तीन वेळा कोल्हापूरला आलो होतो त्यावेळी मला सहा तास प्रचार करण्याची संधी मिळाली. एवढ्या कमी वेळेत शंभराहून अधिक मते मिळाली याचा आनंद आहे असे देखील करुणा मुंडे यांनी सांगितले ! 

  

असा आहे  आक्षेप !

आचारसंहितेचे उल्लंघन झाले असल्याबाबत आपण तक्रार केली असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे. निवडणूक प्रचार १० तारखेपर्यंत होता पण १२ तारखेपर्यंत भाजपा आणि काँग्रेस या पक्षाने सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर जाहिराती दिल्या. निवडणुकीत ४० लाखांपेक्षा अधिक खर्च देखील केलेला असून यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गुन्हा देखील दाखल झाला आहे असे त्यांनी सांगितले.  



हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )



 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !     


  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !