BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ जून, २०२२

डोळ्यात चटणी टाकून मारहाण करून केली लुटमार !


मोहोळ : आपले हॉटेल बंद करून घरी निघालेल्या हॉटेल मालकास भर रस्त्यात गाठून डोळ्यात आणि अंगावर चटणी टाकून लुटण्याची आणखी एक घटना मोहोळ तालुक्यातच घडली आहे. (Mohol Crime) थोड्याफार फरकाने रस्त्यावर होणारी ही मोहोळ तालुक्यातील सलग तिसरी लुट आहे.

 

कालच पंढरपूर - शेटफळ रस्त्यावर ट्रक चालकास बांधून उसात टाकून ट्रकसह साडे तेरा लाखाचा माल पळविण्याची थरारक घटना मोहोळ तालुक्यातील आष्टी शिवारात घडली आहे. त्यापूर्वीच पुण्यावरून येत असलेल्या मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथील हॉटेल व्यावसायिकास अडीच लाखाला लुटण्याची घटना घडली आणि आता पुन्हा आणखी एका हॉटेल व्यावसायिकास अशाच प्रकारे भर रस्त्यावर लुटण्याचा थरारक प्रकार घडला आहे. हॉटेल बंद करून आपल्या घरी दुचाकीवरून निघालेल्या हॉटेल मालकास रस्त्यात अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून ३९ हजार रुपयांची लुट करण्याची घटना घडली आहे त्यामुळे रस्त्यावरून जाणे देखील धोक्याचे ठरू लागले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ ते नरखेडकडे जाणाऱ्या पुलाजवळ विश्वराज भोसले यांचे 'हॉटेल शिवराज' आहे  काल शनिवारी रात्री हॉटेल बंद करून रोजच्याप्रमाणे ते आपल्या घरी निघाले होते. हॉटेलमधील दिवसभराचा गल्ला ३९ हजार रुपये त्यांनी एका बॅगेत घातले आणि आपल्या दुचाकीला ही बॅग लावून ते दुचाकीवरून निघाले होते. नरखेडकडे जाणाऱ्या पुलाखालून सर्व्हिस रोडवर ते मोहोळच्या दिशेने निघाले होते. रात्री उशिरा हॉटेल बंद करून ते निघाले असल्याने रस्त्यावर अंधार तर होताच पण उशीर झाल्याने शुकशुकाटही होता. याचवेळी अचानक थरारनाट्य घडले आणि त्यांची लूटमार करण्यात आली. 


सदर ठिकाणी ते पोहोचले असताना एका दुचाकीवरून तिघे जण तेथे आले आणि भोसले यांच्या दुचाकीला त्यांनी त्यांची दुचाकी आडवी  घातली. अचानक घडलेल्या या प्रकाराने भोसले घाबरून गेले आणि दुचाकी आडवी लावल्याने त्यांना थांबावे लागले. तिघांनीही तोंडाला रुमाल बांधलेले होते त्यामुळे त्यांचे चेहरे दिसण्याचा प्रश्नच नवहता शिवाय अंधार होता. काही कळायच्या आत तिघातील एकाने भोसले यांच्या डोळ्यात आणि अंगावर चटणी टाकली त्यामुळे भोसले खाली पडले. त्यांना काहीच सुचत नव्हते तेवढ्यात त्यांना मारहाण सुरु केली. बेदम मारहाण करीत त्यांचे खिसे तपासण्यात आले. डोळ्यात चटणी टाकल्याने भोसले याना त्रास तर होत होताच पण आजूबाजूचे काही दिसत नव्हते.

 

चटणीमुळे डोळ्यांची आग होत असल्यामुळे त्यांनी आरडाओरडा सुरु केला दरम्यान तेथून जाणारी चार चाकी गाडी त्यांच्याजवळ थांबली आणि त्यांनी विचारपूस केली. भोसले यांनी घडलेली घटना सांगितली. त्यांच्या हॉटेलच्या चाव्यांचा जुडगा तेथेच बाजूला रस्त्यावर फेकून देण्यात आला होता तर दुचाकीला लावलेली ३९ हजार रुपयांची बॅग जागेवर नव्हती. (Hotel owner's road Robbery at Night)सदरची बॅग घेऊन चोरटे पसार देखील झाले होते.  

     

पोलिसात तक्रार दाखल 

चार चाकी वाहनातून निघालेले उदय गायकवाड, चेतन गायकवाड, निलेश गायकवाड यांनी भोसले याना मोहोळ ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे भोसले यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर मोहोळ पोलिसात विश्वराज भोसले यांनी झालेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. 


घबराटीचे वातावरण 

सदर घटनेची मोहोळ तालुक्यात चर्चा सुरु झाली असून मोहोळ तालुक्यात सलग तिसरी अशी घटना घडली आहे त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरून जाणे हे आता मोठे धोक्याचे ठरू लागले असून वारंवार अशा प्रकारच्या लूटमारीच्या घटना घडू लागल्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.   


हे जरूर वाचा : >>

(खालील बातमीला टच करा )



अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा ! 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !