शोध न्यूज : आ. शहाजीबापू पाटील आणि आ. अमोल मिटकरी यांच्यातच आता जोरदार खडाखडी सुरु झाली असून मिटकरी यांनी शहाजीबापूना जॉनी लिव्हर म्हटलं आहे तर बापूनी मिटकरीना सोंगाड्या म्हणून हिणवलं आहे.
"काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... ओक्के" या एका वाक्यावरून प्रसिद्धीला आलेले सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील सतत चर्चेत राहू लागले आहेत. माध्यमांना देखील त्यांच्या नावाने टीआरपी मिळू लागल्यापासून बापू सतत प्रसार माध्यमात दिसू लागले आहेत. त्यांचे साधेसे वाक्य देखील आता बातमी बनू लागली आहे. आमदार शहाजीबापू हे उच्चशिक्षित असून त्यांची 'माणदेशी' आणि रांगडी भाषा आहे. कायमच ते अशी भाषा बोलत आहेत आणि त्यांच्या सभा पूर्वीपासूनच प्रचंड गाजत आहेत. 'काय झाडी, काय डोंगार' मुळे त्यांची ही खासियत महाराष्ट्रभर पोहोचली. एरवी त्यांच्या सभा गाजतच होत्या पण त्यांना अपेक्षित प्रसिद्धी कधी मिळत नव्हती. आता मात्र ते सहज काही बोलले तरी देखील त्याची बातमी होते आणि ती टीव्हीवर झळकत असते.
शहाजीबापू पाटील आणि शिवसेना यांच्यातील वाद आता सगळीकडे माहित झाला आहेच पण आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शहाजीबापू पाटील यांच्यात एकमेकांना उपमा देण्याचा वाद सुरु झाला आहे. शहाजीबापू हे देखील सांगोल्याच्या पलीकडे कधी कुणावर टीका करीत नव्हते पण प्रसिद्धी मिळू लागल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर देखील ते टीका करतात आणि त्याचे पडसाद राज्यात उमटतात. नुकतीच त्यांनी शिवसेनेचे जेष्ठ माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादीने आमदार अमोल मिटकरी हे देखील हजरजबाबी आहेत आणि बऱ्याचदा ते थेट टीका करतात. आ. शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका करताना मिटकरी यांनी 'सोंगाड्या' ची उपमा दिली आणि बापूनी देखील त्याला उत्तर दिले आहे.
सद्याच्या सरकारमध्ये शहाजी पाटील हे एक करमणुकीचं पात्र असून शिंदे गटाचे ते जॉनी लिव्हर आहेत, त्याच्यापलीकडे त्यांची महाराष्ट्रात दुसरी प्रतिमा नाही असे आ. मिटकरी यांनी म्हटले. त्यांच्या मतदारसंघात विकास शून्य आहे, त्यांनी माझी काळजी न घेता, शिंदे गटात त्यांचीच कशी पायखेचणी सुरु आहे याची काळजी घ्यावी' असेही मिटकरी यांनी डिवचले. एवढेच नव्हे तर त्यांनी शिंदे गटात कितीही डायलॉगबाजी केली तरी कॅबिनेट तर सोडाच पण राज्यमंत्री हे पद देखील शहाजीबापूना मिळणार नाही असे मिटकरी यांनी म्हटले. शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर म्हणून त्यांनी ही खिल्ली उडवली आहे. 'अमोल मिटकरी यांचा संजय राउत होणार' असे वक्तव्य आ. पाटील यांनी केले होते त्यामुळे आ. मिटकरी यांनी त्यांना करमणुकीचे पात्र असे संबोधले. हा विषय एवढ्यावर थांबला नाही तर त्याला पुन्हा शहाजीबापू पाटील यांनी उत्तर दिले.
शहाजीबापू पाटील यांनी हा हल्ला परतवून लावताना "मी जॉनी लिव्हर तर मिटकरी हे सोंगाड्या' असे म्हटले आहे. राजकारणात विचार करावा असे अमोल मिटकरी यांचे पात्र नाही, मी जॉनी लिव्हर असेल तर तुम्हीं सोंगाड्या आहेत... संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे आपण त्यांची जागा घेऊ असे मिटकरी याना वाटतेय, त्यामुळेच ते तेल लावून टीव्हीपुढं येतंय' अशा शब्दात आ. शहाजीबापू पाटील यांनी आपल्यावरील हल्ला परतण्याचा प्रयत्न केला. (MLA Shahajibapu Patil is the Johnny Lever of politics राजकारणातील पातळी यापूर्वीच घसरली असून कुणी कुणावरही टीका करीत राहिले तरी करमणूक मात्र महाराष्ट्राची होताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !