BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ एप्रि, २०२२

लबाड व्यापाऱ्याने घातला शेतकऱ्याला गंडा !

.

बार्शी : शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत असतानाच एका व्यापाऱ्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यास गंडा घातला असून कष्टकरी शेतकऱ्याला कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. 


चार पैसे गाठीला येथील म्हणून शेतकरी दिवसरात्र मरमर राबतो, कर्ज काढून शेतीचे उत्पादन घेतो. हिरव्यागार पिकलेल्या शेतीकडे पहात घरातील आर्थिक गणिते तो जुळवत असतो पण त्याच्या कष्टाचा शेतीमाल जेंव्हा बाजारात जातो तेंव्हा त्याला कवडी किंमत येते त्यामुळे तो खचून जातो. फायदा तर दूरच पण काळ्या मातीत घातलेला पैसा देखील त्याच्या हाती येत नाही उलट वाहन भाड्याचे पदरचे पैसे त्याला द्यावे लागतात आणि डोळ्यातून आसवं गाळावी लागतात. कष्ट करून, घाम गाळून, कर्ज काढून शेतकरी पिके वाढवतो आणि त्याच्या हातात बाजारात केवळ 'ढेकूळ' येतो असा अनुभव सारखाच येत असतो त्यातच काही भामटे शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवत त्यांची फसवणूक करीत असतात. बार्शी येथे असाच एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार घडला असल्याने उघडकीस आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी भामट्या लोकापासून सावध राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 


शेतकऱ्याच्या शेतीमालाचे व्यवस्थित नियोजन करण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समिती करीत असते. बाजार समितीत कृषी उत्पादन घेवून गेल्यावर शेतकरी निश्चिंत होतो पण याच बाजार समितीत एका भामट्याने शेतकऱ्याला टोपी घातली आहे. एका लबाड व्यापाऱ्याने शेतकऱ्यास फसवले असल्याने बाजार समिती देखील अडचणीत येण्याची आणि समितीवरील विश्वास उडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तोतया आणि फसव्या व्यापाऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बाजार समिती देखील बदनाम होण्याची वेळ आता आलेली असल्याचे दिसत आहे .


बार्शी येथील शेतकरी बिरुदेव क्षीरसागर यांच्या भोळ्याभाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेत परवाना रद्द झालेल्या इमाम गफूर या फसव्या व्यापाऱ्याने मोठी फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.  कष्टाने पिकवलेला कांदा घेवून बिरुदेव हे शेतकरी बाजार समितीत आले तेंव्हा त्यांना हा लबाड गफूर भेटला आणि चांगल्या भावाने तुमचा कांदा विकून देतो असे सांगितले. या फसव्या गफूरच्या भूलथापांना शेतकरी बळी पडला. घाम गाळून पिकवलेल्या आपल्या कांद्याला चांगला भाव मिळतोय हे ऐकून बिचारा शेतकरी सुखावला पण नंतर मात्र फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आपल्याला गंडवलेला गफूर हा लबाड असल्याचे जाणवले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. 


चांगल्या भावात कांदा विकून देतो म्हणून या भामट्याने शेतकरी बिरुदेव क्षीरसागर यांचा कांदा घेतला आणि त्यांच्या हातात दहा हजार रुपये टेकवले. त्यांच्या कांद्याची ४० हजार रुपयांची पट्टी झाली होती त्यामुळे उर्वरित रकमेचा ३० हजार रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. आपल्या कांद्याला चाळीस हजार रुपये मिळाल्याचा आनंद मनात साठवत विरुदेव समाधानी झाले होते पण  जेंव्हा हा धनादेश बनावट असल्याचे लक्षात आले तेंव्हा बिरुदेव यांना मोठा धक्का बसला.  दरम्यान हा लबाड आणि फसवा व्यापारी गफूर बाजार समिती आवारातूनच पसार झाला होता. बाजार समितीने मात्र लगेच कडक भूमिका घेत जेथे त्यांचा कांदा उतरून घेतला होता त्या दुकानावर बाजार समितीने कारवाई केली आहे. 


बाजार समितीने ही कारवाई करण्याचा फार्स केला असला तरी गरीब शेतकऱ्याने चार महिने या कांद्यासाठी घाम गाळलेला होता त्यांची फसवणूक झाली असून त्यांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण ? हा प्रश्न तसाच अनुत्तरीत राहिला आहे. बाजार समितीत तोतया आणि फसवे लोक फिरत असून ते शेतकऱ्यांची लुट करीत असताना बाजार समिती प्रशासन काय करीत असते ? असा मात्र प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेने शेतकरी धास्तावले असून बाजार समितीच्या प्रशासनाबाबत मात्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !