BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जून, २०२२

वाळूचोरीसाठी लाच, तहसीलदार आले गोत्यात !




लातूर : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी लाच मागणारे तहसीलदार चांगलेच गोत्यात आले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात हा मोठा सरकारी मासा अडकला आहे. 

सगळीकडे वाळू चोरांनी धुमाकूळ घातला असून सतत कारवायांचा सोपस्कार पार पडला जातो, बोटी तोडल्या जातात, वाळूची वाहने जप्त केली जातात पण वाळूची चोरटी वाहतूक आणि वाळू चोरी मात्र थांबलेली कधीच दिसत नाही. ही चोरी का थांबत नाही आणि या वाळू तस्करांना कुणाचा आशीर्वाद असतो याची चर्चा समाजात खुलेआमपणे सुरूच असते. वाळू चोरी का फोफावते आणि वाळू चोर का निर्धास्त असतात याबाबत आता सर्वसामान्य जनतेलाही सगळे काही कळून चुकले आहे पण आज यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तबच झाले आहे. (Bribery for sand theft, Tehsildar caught red handed) अनेकदा छोटे मासे या जाळ्यात अडकतात पण आज मोठा मासा अलगद जाळ्यात अडकला आणि एक खाजगी व्यक्ती देखील गोत्यात आला.


लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तहसीलदार गणेश जाधव यांनी वाळू वाहतूक करणाऱ्याकडे १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली आणि तडजोड होऊन ती दीड लाखावर ठरली. निलंगा तालुक्यातही वाळूचा उपसा प्रचंड प्रमाणात सुरु असतो, तो कुणामुळे असतो याचे उत्तर आज या कारवाईतून मिळाले आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकवर कसलीही कारवाई न करता ही वाहतूक अशीच चालू ठेवण्यासाठी तब्बल पावणे दोन लाखांची लाच तहसीलदार गणेश जाधव यांनी तक्रारदाराकडे मागितली. ही लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. वाळूच्या प्रत्येक ट्रकसाठी तीस हजार प्रमाणे ही लाच मागण्यात आली होती. 

प्रती ट्रक ३० हजार रुपयाप्रमाणे मागील तीन महिन्यांचे मिळून १ लाख ८० हजार होत असल्याचा हिशोब लाचखोर तहसीलदाराने केला आणि त्याप्रमाणे रक्कम मागितली. दोघात झालेल्या तडजोडीने दीड लाखावर अंतिम सौदा पक्का झाला. तक्रारकर्त्यानेही या लाचखोर तहसीलदाराला इंगा दाखविण्याचा विचार पक्का केला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. सदर विभागाने तक्रारीची योग्य पडताळणी करून घेतली आणि पडताळणीत लाच  मागितली असल्याचे समोर आले. त्यानुसार सापळा लावण्यात आला. लाचेची ही रक्कम खाजगी एजंट व्यक्ती रमेश मोगेरगे याच्याकडे देण्यास सांगितले गेले. त्याप्रमाणे तहसीलदार यांच्या घरासमोर लावलेल्या सापळ्यात सदर व्यक्ती दीड लाखाची लाच घेताना दोघानाही रंगेहात पकडण्यात आले. 

वाळू चोरीचे रहस्य !
वाळू चोरी मोठ्या प्रमाणात होते पण महसूल विभाग ती रोखू शकत नाही, कारवाईचे सोपस्कार होतात पण वाळूची तस्करी कधी थांबत नाही. वाळू चोरी न थांबण्याचे कारण सामान्य जनतेलाही माहित आहे पण आज पुन्हा एकदा वाळू चोरी का होते ? याचे रहस्य समोर आले आहे. या आधीही तलाठी, नायब तहसीलदार अशा प्रकरणात अडकलेले आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !