BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ जून, २०२२

तुळशीच्या माळेने फुटली "त्या" खुनाला वाचा !




पंढरपूर : कपडे आणि गळ्यातील तुळशीची माळ यामुळे पंढरपूर तालुक्यातील भानुदास माळी यांच्या खुनाला वाचा फुटली आणि पोलिसांनी एका महिलेसह दोघांच्या मुसक्या आवळल्या. अंत्यसंस्कार केलेला मृतदेह पुन्हा  जमिनीतून बाहेर काढण्यात आला. 


पंढरपूर तालुक्यातील सुपली येथील साठ वर्षे वयाच्या भानुदास माळी यांचा खून झाल्याचे प्रकरण सात दिवसानंतर उघडकीस आले आहे. निलंगा आणि पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या जलदगती तपासामुळे हा खून असल्याचे उघडकीस आले आणि आरोपींचे मनसुभे उधळून गेले. पंढरपूर येथील सांगोला रोडवर राहणारी चाळीस वर्षे वयाची साधना आणि निलंगा तालुक्यातील इमामवाडी येथील २३ वर्षाचा अशोक किने या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात मोठी माहिती पोलिसांना मिळाली असून एकूण या खून प्रकरणातील सगळी रहस्ये (Pandharpur to Nilanga murder mystery) बाहेर आली आहेत. 


निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे एका रस्त्याच्या कडेला एक मृतदेह आढळून आला पण त्याची ओळख पटली नाही. मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती शिवाय रस्त्याच्या कडेला हा मृतदेह होता त्यामुळे सुरुवातीला ही अपघाताची घटना असावी असे वाटून गेले. पण हळूहळू या प्रकरणाचा उलगडा होत गेला आणि चाळीस वर्षाच्या एका महिलेने तिच्या २३ वर्षे वयाच्या प्रियकराच्या मदतीने साठ वर्षीय प्रियकराचा गळा आवळून  खून केल्याचे समोर येत गेले. गुन्हेगार कितीही चलाख असला आणि त्याने कितीही कौशल्य वापरले तरी पोलिसांनी मन लावून तपास केल्यास तो सहज सापडतो याचा अनुभव अनेकदा आला आहे. या प्रकरणात तर पोलिसांनी अत्यंत कुशलतेने काम केले आहे आणि त्यामुळे आरोपी लगेच गजाआड देखील गेले आहेत. 


निलंगा पोलिसांना पानचिंचोली गावाजवळ २८ मे रोजी रस्त्याच्या बाजूला एक अनोळखी मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी पुढील सोपस्कार पार पाडले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडत या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील केले होते. दरम्यान २१ मे रोजी पंढरपूर तालुक्यातील सुपली येथील साठ वर्षे वयाचे भानुदास जगन्नाथ माळी हे बेपत्ता असल्याची तक्रार पंढरपूर तालुका पोलिसांकडे प्राप्त झाली होती. पंढरपूर तालुका पोलिसांनी माळी यांचा तपास सुरु केला होता. माळी यांच्या मोबाईलचे ठिकाण २८ मे रोजी निलंगा येथे होते आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झालेला होता. त्यामुळे पंढरपूर तालुका पोलिसांनी निलंगा पोलिसांशी संपर्क साधला आणि हे खून प्रकरण उघडकीस येण्यास प्रारंभ झाला. पंढरपूर तालुक्यातून बेपत्ता असलेले भानुदास माळी आणि निलंग्यात सापडलेला मृतदेह यांच्यातील वर्णन एकदम जुळत होते.  


अशी पटली ओळख !

पंढरपूर पोलिसांचा संपर्क होण्याआधीच अनोळखी मृतदेहावर निलंगा पोलिसांनी अंत्यसंस्कार केले होते. परंतु मृतदेहाच्या गळ्यात असलेली तुळशीची माळ आणि कपडे पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवले होते. सुपली येथील भानुदास माळी यांचा मुलगा सुशांत माळी यांनी सदर कपडे आणि गळ्यातील तुळशीची माळ ओळखली. त्यामुळे अनोळखी मृतदेह हा पंढरपूर तालुक्यातील भानुदास माळी यांचाच असल्याची खात्री पटली. 


अनैतिक संबधातून खून 

मृतदेहाची ओळख पटताच खुनातील एकेक रहस्य बाहेर येऊ लागली आणि पोलिसांनी पंढरपूर येथील चाळीस वर्षे वयाची महिला साधना हिला ताब्यात घेतले. तिने पोलिसांना या गुन्ह्याची कबुली दिली. तिचा २३ वर्षाचा प्रियकर अमरनाथ किने याच्या मदतीने भानुदास माळी यांचा गळा आवळून खून केला आणि रस्त्याकडेला प्रेत फेकून पसार झाल्याचे सांगितले. सुपली येथील भानुदास माळी आणि निलंगा तालुक्यातील इमामवाडी येथील अमरनाथ किने या दोघांशी या महिलेचे अनैतिक संबध देखील तिने कबूल केले. 


अशी झाली ओळख !

निलंगा तालुक्यातील अमरनाथ हा ड्रायव्हर असून त्याला एका क्लिनरची गरज होती. तशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकली होती. ही पोस्ट पाहून त्यातील मोबाईल क्रमांकावर साधना हिने संपर्क केला आणि यातून दोघांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. एकाच वेळी या महिलेचे भानुदास आणि अमरनाथ यांच्याशी अनैतिक संबध सुरु होते आणि आता तिला भानुदास याची अडचण वाटू लागली होती. 


आणि कारस्थान शिजले !

पंढरपूर येथील सांगोला मार्गावरील दत्त मंदिराजवळ राहणाऱ्या साधनाचे आणि भानुदास माळी यांच्यात अनैतिक संबंध असल्यामुळे तो साधनाच्या घरी येत होता. कधीही आणि कुठल्याही वेळी त्याचे घरी येणे साधनाला नकोसे झाले होते. त्याच्या या वागण्यामुळे साधना त्रस्त झाली होती. आणि याच दरम्यान अमरनाथशी तिची ओळख झाली होती. अमरनाथ आणि तिच्या अनैतिक संबधात अडथळा वाटू लागल्याने साधनाच्या डोक्यात भानुदास यांचा काटा काढण्याचे कारस्थान सुरु झाले. 


दोघांनी आवळला गळा !

निलंगा येथे जायचे असल्याचे सांगून साधना आणि अमरनाथ यांनी भानुदास यांना गाडीत बसवले आणि तिघेही मिळून निलंग्यात पोहोचले. तेथून लातूरकडे येताना रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास वाटेत गाडीतच  दोघांनी  मिळून भानुदास यांचा गळा आवळून त्यांचा खून केला आणि मृतदेह रस्त्याकडेला टाकून दोघे पंढरपूर येथे परत आले होते. 


हे जरूर वाचा : >>

(खालील बातमीला टच करा )





अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा ! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !