BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जून, २०२२

बंदुकीचा धाक दाखवून मालासह ट्रक पळवला !

 



मोहोळ : ट्रक चालकाचे हातपाय बांधून बंदुकीचा धाक दाखवत मालासह ट्रक आणि रोख रक्कम असा साडे तेरा लाखांची लुट केल्याची घटना पंढरपूर - कुर्डूवाडी रस्त्यावर आष्टी शिवारात घडली आहे. 


चार चाकी गाडी भर रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवत आणि लोखंडी पाईपने मारहाण करीत चार भामट्यांनी मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथील हॉटेल व्यावसायिकास अडीच लाखाला लुटण्याची थरारक घटना नुकतीच घडली असताना आता त्याहून मोठी घटना पंढरपूर - शेटफळ रस्त्यावर आष्टी गावाच्या शिवारात माळी वस्तीजवळ घडली असून या थरारक घटनेने खळबळ तर उडवून दिलीच आहे पण रस्त्यावरील वाहतूक देखील आता किती धोकादायक झाली आहे हेच यातून दिसून आले आहे. भर रस्त्यावर बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याची मोहोळ तालुक्यातील ही सलग दुसरी घटना समोर आली आहे. 


सांगोला तालुक्यातील नाझरे येथील प्रविण अंबादास सरगर हे मालट्रक (एम एच १० झेड १३५२) घेऊन जालना येथून येत होते. ट्रकमध्ये आयकॉन कंपनीचे स्टील घेऊन सरगर हे सांगलीकडे निघालेले होते. आष्टी शिवारात माळी वस्तीजवळ आल्यावर लघुशंकेसाठी त्यांनी ट्रक थांबवला आणि  खाली उतरले. दरम्यान पांढऱ्या रंगाची एक इंडिका कार तेथे येऊन थांबली आणि या गाडीतून सहा जण खाली उतरले. (Robbery tremors on Pandharpur-Kurduwadi road)काही कळायच्या आत या सहा जणांनी सरगर यांना पकडले आणि बाजूच्याच ऊसात नेले. पहाटेची वेळ असल्यामुळे आजूबाजूला मदतीसाठी देखील कोणी नव्हते. 


बळजबरीने ट्रक चालक सरगर यांना ऊसाच्या पिकात नेल्यानंतर त्यांना खाली पाडले आणि त्यांच्या अंगावर बसून त्यांचे हातपाय बांधून टाकण्यात आले. यावेळी त्यांना मारहाण देखील करण्यात आली. त्यांच्या डोक्याला बंदूक लावून आणि तलवारीचा धाक दाखवून त्यांची ट्रक आतील मालासह पळवून नेली. त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल यासह एकूण १३ लाख ६१ हजार रुपयांचा माल या चोरट्यांनी चोरून नेला.


ठार मारण्याची धमकी 
सरगर यांच्या डोक्याला बंदूक लावत आणि तलवारीचा धाक दाखवत त्यांना ठार मारण्याची धमकी या अज्ञात चोरट्यानी त्यांना दिली. पहाटेच्या वेळी आजूबाजूलाही कुणी दिसत नव्हते आणि सहा जणांच्या पुढे सरगर यांचे काहीच चालू शकत नव्हते. अखेर सरगर यांना बांधून ऊसाच्या पिकात टाकले आणि मालासह ट्रक पळवून नेला. 


लाखोंची लूट करून पसार !
सरगर यांच्या खिशातील वीस हजार रुपये, ८ लाख ४० ह्जार रुपयांचे बारा टन स्टील, ५ लाखांचा ट्रक, मोबाईल असा एकूण १३ लाख ६१ हजार ५०० रुपयांची ही लुट झाली आहे. बांधलेल्या अवस्थेत उसाच्या पिकात चालक सरगर तसेच पडून राहिलेले होते. 


सुटका करून घेतली !
पहाटेच्या वेळी हा सगळा थरारक प्रकार झाल्यानंतर त्यांनी प्रयत्न करून पायाची दोरी सोडली आणि ते रस्त्यावर आले. रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या एका घरी जावून त्यांनी तेथून मोबाईल मागून घेतला आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या थरारक घटनेबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !