BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ मे, २०२२

फौजदारानेच केली विजेची चोरी आणि वर केली दंडेलशाही !

 


फलटण : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस फौजदाराने आकडे टाकून विजेची चोरी तर केलीच पण चोरी रोखण्यासाठी गेलेल्या महावितरण अभियंत्याशी दंडेलशाही देखील केल्याची घटना समोर आली असून नागरिकांनी मात्र तोंडात बोट घातले आहे.


सामान्य माणूस कायदा मोडतो पण याच कायद्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. कायदे मोडणाऱ्या व्यक्तीला शिक्षेपर्यंत पोहोचविण्याची दक्षता पोलीस घेत असतात आणि चोऱ्या होणार नाहीत यासाठी दिवसरात्र पोलीस दक्ष असतात. अशा कायद्याच्या राक्षकानेच विजेची चोरी केल्याचे प्रकरण फलटण तालुक्यातील गिरवी येथे समोर आले आहे आणि याबाबत पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलीस विभागातील व्यक्तीने विजेची चोरी केल्याच्या या प्रकरणी केवळ फलटण नव्हे तर सातारा जिल्हाभर आणि पोलीस दलात देखील चर्चा सुरु आहे. पोलिसाच चोऱ्या करू लागले तर चोरांना रोखणार कोण ? असा सवाल सामान्य नागरिक देखील आता विचारू लागला आहे. 


वरळी येथे सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत असेलेल्या दीपक सोपान निकाळजे यांच्या मालकीचे हॉटेल निशांत नावाचे एक हॉटेल फलटण तालुक्यातील गिरवी येथे आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार 'हॉटेल निशांत' साठी विजेच्या तारेवर आकडा टाकून वीज चोरी केली जात असल्याची बाब महावितरणचे सहाय्यक अभिन्यांता भरत भोसले यांच्या निदर्शनास आली. भोसले हे या हॉटेलवर कारवाई करण्यासाठी आणि वीज चोरी रोखण्यासाठी गेले आणि त्यांनी तारेवरचा आकडा काढून टाकला. त्यानंतर ते पुढील कारवाईसाठी महावितरण शाखा कार्यालयाकडे निघाले असता दीपक निकाळजे यांनी त्यांना रोखले आणि भोसले यांना दमदाटी सुरु केली.

 
महावितरण अभियंता भोसले यांना गाडीतून खाली खेचून विजेच्या तारेवरचा आकडा कशासाठी काढला ? असा सवाल करून शिवीगाळ सुरु केली. एवढेच नव्हे तर 'अभियंता भोसले यांच्या अंगावर धावून जात हात पाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली. ' तू गिरवी गावात पाय ठेवून दाखव, तुझे हात पाय तोडीन, तुला जिवंत ठेवणार नाही' असे म्हणत धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. वीज चोरी पकडणे हे माझे कामच आहे असे भोसले वारंवार सांगत असतानाही निकाळजे यांनी काही ऐकले नाही आणि धमक्या देतच राहिले असे देखील भोसले यांनी नमूद केले आहे. (Electricity theft by the police-Threat to Mahavitaran Engineer) हॉटेल मालक निकाळजे हे वरळी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत असल्याचे समजते. 


१ हजार २७९ युनिट चोरी 
दीपक निकाळजे यांनी १ हजार २७९ युनिट विजेची चोरी केली असून त्यांना १९ हजार ९४ रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. आकडा काढल्यानंतर घडलेल्या घटनेमुळे धमकी देणे आणि शासकीय कामात अडथळा करणे याबाबत स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


परिसरात खळबळ !
कायद्याच्या रक्षकाने विजेची चोरी केली आणि ती पकडली गेल्यावर शासकीय अधिकाऱ्यास धमकी देत करण्यात आलेल्या दंडेलशाहीची चर्चा फलटण तालुक्यात होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. ज्याने चोरी रोखायची आणि चोराला शासन होईल यासाठी प्रयत्न करायचे त्यानेच चोरी केल्याचे हे प्रकरण अनेकांना धक्का देवून गेले आहे.  


  

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !