BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ मे, २०२२

कोरोनाच्या संकटातून सोलापूर मुक्त !


सोलापूर : कोरोनाच्या संकटातून सोलापूर शहर मुक्त झाले असून  आता केवळ तीन तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे. दिलासादायक बाब म्हणजे  जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात एकही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.


कोरोनाच प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सोलापूर जिल्हा राज्यात सतत आघाडीवर राहिला परंतु कोरोनाची तिसरी लाट ओसरत निघाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत गेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने सोलापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान केले आहे, विशेषत: पंढरपूर तालुका या कोरोनाच्या संकटात अधिक गुदमरला आणि सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यातील झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या देखील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातच सर्वाधिक राहिली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी राहिला त्यामुळे साहजिकच काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. चौथ्या लाटेची चर्चा असली तरी सद्या मात्र जिल्हा कोरोनाच्या संकटातून बाहेर पडू लागला आहे. 


सोलापूर शहर पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून ७ एप्रिलपासून शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अधून मधून एखादा दुसरा रुग्ण आढळत राहिला पण आता केवळ तीन तालुक्यात कोरोनाचे आस्तित्व उरले आहे. पंढरपूर, बार्शी आणि मंगळवेढा या तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण असून अन्य सर्व तालुक्यातून कोरोना हद्दपार झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सोलापूर शहरात ३३ हजार ६६६ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या आहेत तर ग्रामीण भागात १ लाख ८६ हजार ६४ व्यक्ती कोरोना बाधित झाल्या. सोलापूर जिल्हा हा कोरोनात देशात पहिल्या दहा जिल्ह्यात आघाडीवर होता आणि मृत्यूंचे प्रमाण देखील अधिक होते. (Solapur free from Corona crisis) कोरोनाबाधित होणाऱ्या नागरिकांची रोजची संख्या तीन हजाराहून अधिक होती त्यामुळे अधिक चिंता निर्माण झाली होती.

 

कोरोनावर मात !

कोरोनाचे प्रचंड मोठे संकट आलेले असले आणि मृत्यूंची संख्या वाढत राहिली तरी सोलापूर जिल्ह्यातील २ लाख १९ हजार ७३० रुग्णांपैकी २ लाख १४ हजार ४९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तरुण रुग्णांचा बळी कोरोनामुळे जात असताना वयोवृद्ध रुग्ण कोरोनाला हरवून रुग्णालयातून बाहेर आल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशी उदाहरणे कोरोना रुग्णांना मानसिक आधार देत राहिली आहेत. 


महिन्यात मृत्यू नाही !

सोलापूर जिल्ह्यात आता केवळ नावापुरता कोरोना उरला आहे. पंढरपूर, बार्शी आणि मंगळवेढा येथे प्रत्येकी एक रुग्ण असून उर्वरित तालुके पूर्णपणे कोरोनाच्या संकटातून बाहेर आलेले आहेत. सद्या कोरोनाचे रुग्ण नगण्य तर आहेतच पण दिलासादायक बाब म्हणजे महिन्याभरात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 


पाच हजार रुग्णांचा मृत्यू 

मार्च २०२० मध्ये कोरोनाला सुरुवात झाल्यानंतर एप्रिलमध्ये सोलापूर जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला होता आणि त्यानंतर तब्बल २ लाख १९ हजार ७३० व्यक्ती कोरोना बाधित झाल्या त्यातील २ लाख १४ हजार ४९६ रुग्ण या संकटातून बाहेर आले परंतु सोलापूर जिल्ह्यात दुर्दैवाने ५ हजार २३१ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.   


हे देखील वाचा >>>


  

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !