BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ सप्टें, २०२२

पंढरपूर पुलावर एस. टी. अपघात, मोठा अनर्थ टळला !

 


पंढरपूर (विजय काळे ) भीमा नदीच्या पुलावर एस टी अपघात झाला असून चालकाच्या कौशल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. थोडासा गाफिलपणा झाला असता तर प्रवाशांना घेवून निघालेली एस टी बस थेट भीमा नदीत कोसळली असती.


सुरक्षित प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस कडे पहिले जाते परंतु अलीकडच्या काळात एस टी चे देखील अपघात वाढू लागले आहेत. पंढरपूर येथील भीमा नदीच्या पुलावर मध्यरात्री झालेल्या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी बसची अवस्था पाहता कुणाच्याही काळजाचा ठोका चुकत आहे. पंढरपूर येथे भीमा नदीवर जुन्या दगडी पुलाशेजारी नवीन पूल बांधण्यात आला आहे. पुराच्या पातळीपेक्षा हा पूल उंच बांधण्यात आला असल्याने या पुलाची उंची देखील मोठी आहे आणि याच उंचीवरून एस. टी भीमा नदीत कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. 


मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून कोल्हापूर- माजलगाव (एम एच १३ सी यु ७८३६) ही बस पंढरपूरकडून सोलापूरच्या दिशेने निघाली होती. सदर बस भीमा नदीच्या पुलावर आल्यानंतर फुटपाथचा कठडा तोडून पुलाच्या एकदम कडेला गेली आणि लोखंडी बारला घासू लागली. चालकाने बस कोसळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. लोखंडी बारला घासत ही बस काही अंतर गेली आहे. चालकाच्या बाजूने ही बस बारला घासत गेली. तशाही परिस्थितीत चालकाने बस रस्त्याच्या बाजूने घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. 


या बाबत समजलेली माहिती अशी की, सदर बसमधून ३० प्रवासी प्रवास करीत होते. नुकतेच पंढरपूर सोडल्यामुळे बसमधील बहुसंख्य प्रवासी जागे होते तर काही अर्धवट झोपेत होते. बस पुलावर आली तेंव्हा अचानक गार्ड स्टोनला धडकून टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटू लागले. सिमेंट कठडा तोडून बस चुकीच्या दिशेला भरकटली. प्रवाशांना घेवून ही बस पुलावरून खाली कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने आणि चालकाने दाखविलेल्या कौशल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. 


अपघात होताच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याची चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर नेमकी परिस्थिती समोर येईल. कठड्याला धडकलेल्या बसचे बरेच नुकसानही झाले असून जागेवरच आज सकाळी बसचा फुटलेला टायर बदलण्यात आला असून अन्य दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे. (S.T. Accident on Pandharpur Bridge major calamity was avoided) पुलावरून जाणारा प्रत्येकजण येथे थांबून बसची परिस्थिती पाहत आहे. बसची एकूण अवस्था पाहून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकत आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !