BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ मे, २०२२

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे पूर्वीचे 'बौद्ध विहार' !

  



देशात मंदिर की मस्जिद हा वाद अनेक वर्षांपासून सुरु असताना आता एक नवा विषय ऐरणीवर आलेला असून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासह देशातील अनेक मंदिरे ही पूर्वीची बौध्द विहार असल्याचा दावा करून ती हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.


पंढरपूरला मोठी संत परंपरा असून देशभरातून भाविक आणि विदेशातून देखील पर्यटक पंढरीला येत असतात. महाराष्ट्र आणि विठ्ठल मंदिर यांची घट्ट सांगड आहे. महाराष्ट्राच्या मोठ्या श्रद्धा आणि भावना पंढरीशी आणि  विठ्ठल मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत. हिंदू देवस्थान असा विठ्ठल मंदिराचा उल्लेख केला जात असून शेकडो वर्षांची परंपरा सांगितली जाते. विठ्ठल मंदिराच्या प्राचीनतेच देखील इतिहास सांगण्यात येतो परंतु विठ्ठल मंदिर हे पूर्वीचे बौध्द विहार असल्याचे काही वर्षांपूर्वीच जेष्ठ साहित्यिक आणि अभ्यासक मा. म. देशमुख यांनी पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात झालेल्या एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले होते आणि त्याचे पुरावे द्यायला तयार असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. (The Vitthal Temple at Pandharpur is a former Buddhist monastery) त्याकाळी हा विषय फारसा चर्चिला गेला नाही पण आता विठ्ठल मंदिरासह देशातील अनेक मंदिरे अशीच चर्चेला आली आहेत. 


अयोध्येत राम मंदिर होते की बाबरी मशीद होती यावर अनेक वर्षे काथ्याकुट झाला आणि अनेक कारसेवकांचा बळी देखील गेला. न्यायालयाने तोडगा काढल्यानंतर आता हा वाद शांत झालेला असताना गेल्या काही दिवसांपासून काही मशिदी या मंदिरे उध्वस्त करून बांधल्या गेल्याचे दावे समोर येऊ लागले आहेत. हा विषय पुण्यापर्यंत येवून ठेपला असताना आता लाखो लाखो भाविकांचे श्रद्धास्र्थान असलेले पंढरीचे विठ्ठल मंदिर देखील हस्तांतरित करण्याची मागणी पुढे आली आहे. देशातील जगन्नाथ पुरी, तिरुपती बालाजी, विठ्ठल मंदिर पंढरपूर, कांचीपुरम, महाकाली अशी अनेक मंदिरे पूर्वीची बौध्द विहार, बौद्ध स्तूप , बुद्ध चैत्य आहेत आणि ही मंदिरे पुरोहितांच्या आर्थिक उत्पन्नाचे मोठे स्त्रोत बनलेली आहेत म्हणून ही सर्व मंदिरे बौद्धांना हस्तांतरित करण्यात यावीत अशी मोठी मागणीच जेष्ठ साहित्यिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य डॉ. प्रदीप आगलावे (Dr. Pradip Agalave)यांनी केली आहे.  


प्रबोधनकरांचा संदर्भ  


 डॉ. प्रदीप आगलावे यांनी आपल्या निवेदनात प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. प्रबोधनकारांनी १९२९ मध्ये लिहिलेल्या 'देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे' या पुस्तकात "ठिकठीकाणचा बौध्द विहारातल्या पवित्र वस्तूंचा आणि बौध्द मूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या' असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. लोणावळ्याजवळ असलेल्या एकविरा देवी मंदिराचाही उल्लेख करून त्यांनी  कार्ला लेणी पहा असे म्हणत ही बौद्धाची असल्याचे म्हटले आहे.  


पंढरपूर हे बुद्धाचे देवालय 


 डॉ. प्रदीप आगलावे यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाबत देखील आपल्या निवेदनात भाष्य केले असून विठ्ठल मंदिर हे देखील पूर्वीचे बौध्द मंदिर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा संदर्भ दिला आहे. ' दिनांक २५ डिसेंबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या एका भाषणात सांगितले होते की, पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौध्द धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन" असा संदर्भ  डॉ. प्रदीप आगलावे यांनी दिला आहे. 


हस्तांतरित करा !


देशातील अनेक हिंदू मंदिरे म्हणून प्रसिद्ध असणारी मंदिरे ही बौध्द मंदिरे, बुध्द स्तूप असल्याचा हवाला देत डॉ. प्रदीप आगलावे यांनी ही मंदिरे बौद्धांना हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. एकीकडे मंदिर आणि मशीद यांचा वाद उफाळून आला असतानाच आता या मागणीने हिंदू आणि बौद्धांचे लक्ष वेधले आहे.   


हे जरूर वाचा : >>> 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !