BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ मे, २०२२

विधवेच्या कपाळी कुंकू, पायात जोडवे ! परिवर्तनाची नांदी !




नाशिक : पतीचे निधन झाल्यानंतर वैधव्य आलेल्या सुगंधाबाई चांदगुडे या ७६ वर्षे वयाच्या विधवा महिलेने पुन्हा कपाळावर कुंकू लावले आणि पायात जोडवी घातली आहेत. महाराष्ट्र राज्यातील परिवर्तनाचे हे पहिले उदाहरण ठरले आहे. 


पतीचे निधन झाले की विधवा झालेल्या महिलेचे सामाजिक धार्मिक हक्क रूढी, परंपरा हिसकावून घेतात आणि तिच्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. पतीचे निधन झाले की गळ्यातील मंगळसूत्र तोडले जाते, हातातल्या बांगड्या फोडल्या जातात आणि कपाळावरचं कुंकू पुसलं जातं, याबरोबरच तिचे सामाजिक हक्क देखील हिसकावले जातात आणि धार्मिक कार्यक्रमात देखील तिचा सन्मान दिला जात नाही. विधवा महिलांना रूढी परंपरेने अनेक बंधने घातलेली असून ही सगळी बंधने तिच्या हक्कापासून वंचित ठेवणारी आहेत. काही वर्षांपूर्वी सती जाण्याची अत्यंत अनिष्ठ प्रथा बंद झाली पण विधवेचे हिरावले जात असलेले हक्क तिला अजून मिळाले नाहीत. विधवा महिलांनी असेच जगायचे असते अशी मानसिकताच तयार झाली आहे  त्यामुळे याविरोधात कधी बंड देखील केले जात नाही. 


कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाच्या गावकऱ्यानी एकत्र येत या अनिष्ठ रूढीविरोधात बंड पुकारले आणि विधवा महिलांना देखील सन्मानाचे जगणे प्रदान करण्याचे ठरवले. या गावाने ग्रामपंचायतीचा ठराव करून विधवा प्रथा बंद पाडली आणि राज्यभर त्याचे कौतुक झाले. एका मोठ्या परिवर्तनाची सुरुवात या गावातून झाली आणि राज्य शासनाने राज्यातील सर्वच ग्रामपंचायातीना या गावाचा आदर्श घेण्याचे आवाहन केले आहे. हेरवाड ग्रामपंचायतीच्या ठरावाचे रुपांतर शासन निर्णयात झाले आहे. तोच नाशिक येथील ७६ वर्षे वयाच्या सुगंधाबाई चांदगुडे यांच्या कपाळावर तब्बल १३ वर्षांनी कुंकू लागले आणि  पायात पुन्हा जोडवी दिसू लागली आहेत. राज्यातील हे पहिले उदाहरण आहे. 


परंपरेची बंधने तुटली ! 
अहमदनगर जिल्यातील कोपरगाव येथील मूळचे रहिवाशी असलेले त्र्यंबकराव चांदगुडे हे शेतकरी होते. सद्या त्यांची पत्नी सुगंधाबाई चांदगुडे आणि  मुलगा कृष्णा चांदगुडे नाशिक येथे राहतात. कृष्णा चांदगुडे यांनी अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीत जात पंचायत विरोधी  चळवळ उभी केली आहे. हेरवाड येथील ठराव आणि राज्य शासनाचा निर्णय येताच त्यांनी आपल्या ७६ वर्षांच्या आईच्या कपाळावर कुंकू लावले, गळ्यात मंगळसूत्र घालायला दिले आणि आपल्या हाताने आईच्या पायात जोडवे घातले. 


तेरा वर्षांपूर्वी वैधव्य !
सुगंधाबाई चांदगुडे यांना १३ वर्षांपूर्वी वैधव्य आले होते. पतीच्या निधनानंतर त्यांनी कपाळावरील कुंकू पुसले होते आणि गळ्यातील मंगळसूत्र काढले होते. रुढीप्रमाणे विधवेचे जीवन त्या जगत होत्या. त्यांचा मुलगा कृष्णा यांनी आपल्या विधवा आईला शासनाचे परिपत्रक दाखवले आणि वृद्ध आई रुधीची बंधने तोडण्यास तयार झाल्या. त्यांच्या कपाळावर पुन्हा कुंकू लागताच राज्यभर याची चर्चा होऊ लागली असून विज्ञात युगात एक मोठे परिवर्तन येऊ घातले आहे. 


दुय्यम वागणूक मिळत होती 
विधवा झाल्यानंतर आपल्याला समाजात दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती पण आता आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया सुगंधाबाई चांदगुडे यांनी दिली आहे. माझा मुलगा अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करतो, घरात अनेक निर्णय सुधारणावादी घेतले असून आपल्या घरातूनच आधी सुरुवात केली म्हणजे समाजात चांगला संदेश जातो. हा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि समाज परिवर्तन करावे असे सुगंधाबाई चांदगुडे यांनी सांगितले.


हे देखील वाचा : >>


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !