BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ मे, २०२२

भरणे मामा, आपण निष्ठुर आहात ! माजी मंत्री सुभाष देशमुख आक्रमक !

 


सोलापूर : भरणेमामा, आपण निष्ठुर आहात, उजनीचे पाणी  पळवाल तर सोलापुरात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा आता भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे. 


उजनीच्या पाण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे पुन्हा एकदा वादात सापडले असून लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले असतानाच काल काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी अत्यंत कडक शब्दात इशारा दिला होता. सत्तेशी आपल्याला देणेघेणे नाही, उजनीचे पाणी पळवाल तर खबरदार ! असा इशारा राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सत्तेत असताना उजनीच्या पाण्यावर या दोन्ही पक्षात संघर्ष सुरु झाला आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाने देखील उडी घेतली आहे. उजनी धरणातील दोन टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर करण्यात आल्यामुळे संघर्षाचा भडका होऊ लागला आहे. 


सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. इंदापूर तालुक्याला उजनीचे पाणी नेण्याचा विषय यापूर्वी देखील पेटला होता आणि लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाल्यानंतर शासनाला देखील निर्णय फिरवावा लागला होता. राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीने काढावे अशी मागणी देखील होत होती.  त्यानंतर आता पुन्हा इंदापूरला उजनीचे पाणी नेण्याचा विषय ऐरणीवर आला आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. (Ujjain water dispute, Subhash Deshmukh is aggressive) राजकीय वातावरण देखील आता तापू लागले असून काल आ. प्रणिती शिंदे तर आज माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तोफ डागली आहे. 


इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातील पाणी नेण्यास सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनाकडून जोरदार विरोध होत आहे. मागील वर्षी असाच वाद उफाळून आला होता आणि आता तो पुन्हा ऐरणीवर आला आहे. उजनी धरणातून दोन टीमसी पाण्यास इंदापूरसाठी मान्यता देण्यात आली असून  राज्य शासनाने यासाठी ३४८ कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे. सोलापूरच्या वाट्याचा एक थेंब देखील इंदापूरला नेला जाणार नाही असे पालकमंत्री दत्तामामा भरणे सतत सांगत आहेत पण सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे दोन टीएमसी पाणी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा संघर्ष भडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 


'पालक' मंत्री आहात !
माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे आता आक्रमक झाले असून त्यांनी  पालकमंत्री भरणे यांनाच इशारा दिला आहे. तुम्ही इंदापूरचे लोकप्रतिनिधी असला तरी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. जेंव्हा एखाद्या जिल्ह्याचे पालकत्व घेतले जाते तेंव्हा त्या जिल्ह्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशी आपली भूमिका असायला हवी असे देशमुख यांनी म्हटले आहे. 

मामांचे वागणे निष्ठुर !
पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याचे पालकत्व घेणारे भरणे मामा, आपण निष्ठुर आणि स्वार्थीपणाने वागत आहात. उजनीच्या पाण्याचा एकही थेंब पुणे जिल्हा, इंदापूर तालुका अथवा बारामती तालुक्याला जाऊ देणार नाही आणि पाणी पळविणाऱ्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यात पाउल ठेवू दिले जाणार नाही असा इशाराच देशमुख यांनी दिला शिवाय सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून पाण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. 

हे देखील वाचा : >>




   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !