BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ मे, २०२२

उजनीचे पाणी पळवाल तर खबरदार ! आ. प्रणिती शिंदे यांनी ललकारले !

 


सोलापूर : सोलापूरचे पाणी पळवाल तर खबरदार, मला सत्तेशी देणेघेणे नाही असा सणसणीत इशाराच सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Ptaniti Shinde) यांनी आज दिला आहे. 


उजनी धरण हे सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले असून उजाड माळरानावर देखील या पाण्याने नंदनवन उभे केले आहे. हरितक्रांती केलेले उजनीचे पाणी अनेकदा संघर्षाची आग देखील ओकत असते आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ओतलेल्या या धरणाचे पाणी अधूनमधून पेटत असते. उजनीच्या पाण्याची पळवापळवी करण्याचे प्रकार आधीपासूनच घडत आहेत पण गेल्या दोन वर्षांपासून इंदापूरला पाणी नेण्याचा होत असलेला प्रयत्न अधिकच चिघळत गेला आहे. 


सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. इंदापूर तालुक्याला उजनीचे पाणी नेण्याचा विषय यापूर्वी देखील पेटला होता आणि लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाल्यानंतर शासनाला देखील निर्णय फिरवावा लागला होता. राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीने काढावे अशी मागणी देखील होत होती.  त्यानंतर आता पुन्हा इंदापूरला उजनीचे पाणी नेण्याचा विषय ऐरणीवर आला आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या वातावरणातच आ. प्रणिती शिंदे यांनी तोफ डागली आहे. 


काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असलेल्या आ. प्रणिती शिंदे यांनी उजनीचे पाणी इंदापूर आणि बारामतीला देण्याच्या विषयावर आज आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे सांगितली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी वीस वर्षांपूर्वी उजनी धरणाचे पाणी पाईपलाईनद्वारे सोलापूर येथे आणले आहे. उजनी धरण सद्या प्लसमध्ये असून देखील महापालिकेतून पाण्याचे नियोजन होताना दिसत नाही. राज्यात काँग्रेसचे सरकार होते तेंव्हा ऐन दुष्काळात देखील सोलापूर शहराला दोन दिवसाआड पाणी मिळत होते. उजनी धरण त्यावेळी मायनसमध्ये होते तरी सोलापूरचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवला गेला होता याची आठवण आमदार प्रणिती शिंदे यांनी करून दिली.  


पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना दोन कोटी रुपये खर्च करून एका रात्रीत सक्शन पंप लावून एका रात्रीतच पाणी आणले गेले होते, दुष्काळ पडलेला असताना देखील हद्दवाढ भागात दोन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आत्ता तर उजनी धरण प्लसमध्ये असताना पाणी दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही काय मेलो आहोत काय ? असा जळजळीत सवाल देखील त्यांनी विचारला आहे. (Ujani water MLA Praniti Shinde aggressive)उजनीचे पाणी  पेट घेत असताना आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे पुन्हा टार्गेट होत असताना आता आ. प्रणिती शिंदे यांनी देखील ललकारले आहे. 


सत्तेशी देणेघेणे नाही 
"सोलापूरचे पाणी  पळविण्याचा प्रयत्न केला तर रान पेटवू. मला सत्तेशी काही देणेघेणे नाही, मी लहानपणापासून सत्ता पाहिलेली आहे. सोलापूरचे पाणी वळवत असाल तर खबरदार !आमच्या पाण्याला हात लावू नका" अशा शब्दात आ. प्रणिती शिंदे यांनी इशारा दिला आहे. राज्य सरकारमध्ये काँग्रेस सत्तेत असूनही त्यांनी राष्ट्रवादीला हा इशारा दिला आहे.  


तर सन्यास घेईन 
उजनीचे पाणी इंदापूर बारामतीला पळविले जात असल्याचा आरोप होत असताना आणि सोलापूर जिल्हा आक्रमक होऊ लागला होता तेंव्हा पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. सोलापूर जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाण्यातील एक थेंब जरी इंदापूरसाठी गेला तर राजकारणातून सन्यास घेईन असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले होते. सोलापूरच्या वाटणीचा उजनी धरणातील पाण्याचा एक थेंब देखील इंदापूरसाठी जाणार नाही असे त्यांनी वारंवार सांगितले होते.  


हे देखील वाचा : >>








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !