BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ मे, २०२२

पडक्या घरात सोन्याचा हंडा सापडल्याची अफवा !

 

प्रतीकात्मक चित्र 


मंगळवेढा : पडक्या घरात सोन्याचा हंडा सापडल्याची अफवा पसरली परंतु प्रत्यक्षात येथे ब्रिटीशकालिन ४५ मौल्यवान नाणी आढळून आली असून ती शासनाकडे जमा न केल्यामुळे एकाविरुद्ध गुन्हा दाखल (Mangalawedha Crime) करण्यात आला आहे. 


महाराष्ट्राला मोठा शिवकालिन इतिहास असून सोलापूर जिल्ह्यातील काही गावात शिवकालाच्या पाउलखुणा आढळून येतात. कुठल्यातरी कारणासाठी खोदकाम करताना शिवकालिन नाणी, तलवारी आदी साहित्य अजूनही आढळून येते. यापूर्वीदेखील हा ऐतिहासिक खजिना आढळून आलेला असून तो शासनजमा करण्यात आलेला आहे. अशा काही वस्तू जमिनीत आढळून आल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनास देणे आवश्यक असते परंतु काही वेळा तसे केले जात नाही. मंगळवेढा येथे देखील अशीच घटना घडली असून एका पडक्या घरात सोन्याचा हंडा सापडल्याची अफवा शहरभर पसरली होती. मंगळवेढा शहरात एक किल्ला असून या शहराला ऐतिहासिक वारसा आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात अशा प्रकारची काही अफवा पसरली तरी लोकांचा त्यावर विश्वास बसतो. प्रत्यक्षात येथे सोन्याचा हंडा नव्हे तर ब्रिटीश काळातील काही नाणी सापडली असल्याचे समोर आले आहे. 


सापडलेली ब्रिटीशकालीन ४५ नाणी एकाला सापडली आणि दुसऱ्याने त्याची फसवणूक करून नाणी आपल्याकडे ठेवल्याचा प्रकार समोर आला. लहान मुलाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला पण अखेर हे प्रकरण उघडे पडले आणि फसवणुकीच्या आरोपावरून पांडुरंग दिगंबर मेरू याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. शिवाजी होडगे (तुकाईनगर) यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.  होडगे यांचा मंगळवेढ्याच्या कुंभार गल्लीत एक जुना वाडा आहे हा वाडा जुना आणि पडक्या अवस्थेत आहे त्यामुळे मंगळवारी एक मुलगा येथे लघुशंकेसाठी गेला होता. येथे त्याला एक वाटी आणि ब्रिटीशकालिन असलेली ४५ मौल्यवान नाणी आढळून आली. 


फसवणूकीची तक्रार 
सदरची नाणी पोलिसांकडे जमा करतो म्हणून पैशाचे आमिष दाखवून पांडुरंग मेरू याने ही नाणी आपल्याकडे घेतली आणि प्रत्यक्षात ती प्रशासनाकडे जमा केलीच नाहीत. त्याने ती स्वत:कडे ठेवून फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पांडुरंग मेरू याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 


सोन्याचा हंडा सापडला !
सोन्याचा हंडा सापडला असल्याची अफवा मंगळवेढा शहरात पसरली आणि हा एक चर्चेचा विषय बनला. याबाबत अनेकजण उत्सुकतेने एकमेकांकडे विचारणा देखील करीत होते. दरम्यान सहाय्यक फौजदार शेख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता प्रत्यक्षात कसलाही हंडा नसून ब्रिटीशकालिन नाणी सापडल्याचे समोर आले. सदर ४५ नाण्यांसह आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पुढील कारवाई करण्यात आली. 


पाच वर्षांपूर्वी ---
पाच वर्षांपूर्वीही मंगळवेढ्यात दुसऱ्या एका ठिकाणी सोन्याचा हंडा असल्याची चर्चा झाली होती. एका पडक्या वाड्यात सोन्याचा हंडा असल्याच्या कल्पनेने हा हंडा प्राप्त करण्यासाठी मांत्रिकाला बोलावून येथे पूजा करण्यात आली होती. हंडा मिळविण्यासाठी विधी केला जात असतानाच पोलिसांनी येथे छापा टाकला होता आणि या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले होते.    


हे देखील वाचा : >>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !