BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ मे, २०२२

दगड विटांनी मारून जन्मदात्या आईचा खून !


सांगली : स्वयंपाक चांगला करीत नाही म्हणून जन्मदात्या आईला दगड विटांनी ठेचून तिचा खून करण्याची अत्यंत निद्य आणि धक्कादायक घटना आगळगाव (कवठे महांकाळ) येथे घडली आहे.

 

अलीकडे नात्यातली वीण उसवताना दिसणाऱ्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात पण जन्मदात्या आईला ठेचून मारण्याच्या या घटनेने माणसातला राक्षस पुन्हा एकदा समोर आला आहे. ज्या आईने जन्म दिला आणि पदराच्या सावलीत लहानाचा मोठा केला त्या मुलाने अत्यंत सामान्य कारणासाठी आईचाच जीव घेतला असल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपलेल्या मुलानेच आईचा जीव घेतल्याची घटना समोर आल्याने ज्याला त्याला मोठा धक्का बसला असून या घटनेचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. घटना ऐकूनच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. 


केवळ स्वयंपाक चांगला करीत नाही एवढ्या कारणावरून जन्मदात्या पण नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने लोखंडी फुंकणी, दगड आणि विटांनी मारहाण करून आईचा जीव घेतला. पन्नास वर्षे वयाच्या दशरथ ज्ञानू जाधव याने आपली सत्तर वर्षांची आई राजाक्का जाधव यांना मारून टाकले आहे. दशरथ हा दारूच्या आहारी गेलेला होता आणि त्याच्या पत्नीचाही मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीत जीवापाड कष्ट करून वृद्ध आई त्याला आणि त्याच्या दोन मुलांना सांभाळत होती. सत्तर वर्षाच्या वृद्ध आईला मुलाने सांभाळण्याऐवजी वृद्ध आईच पन्नास वर्षाच्या मुलासह त्याच्या दोन मुलांना सांभाळत होती आणि  या कष्टाची परतफेड नराधम मुलाने तिचा जीव घेवून केली. 


दशरथ याची दोन्ही मुले परगावी गेल्याने आई आणि बेवडा दशरथ दोघेच घरी होते. दशरथ दारू पिलेल्या अवस्थेत घरात धिंगाणा घालू लागला आणि आईला मारहाण करू लागला. आज तुला जिवंत ठेवतच नाही असे तो आईला नेहमी म्हणत असायचा. अखेर त्याने लोखंडी फुंकणी, दगड आणि विटांनी आईला बेदम मारले आणि या मारहाणीत वृद्ध आई जखमी झाली. (Murder of an old mother by her son) राजक्काच्या मुलीच्या मुलाला शेजाऱ्याने फोन करून ही माहिती दिली तेंव्हा नातू गणेश भोसले हा रांजणी येथून आला आणि राजक्काला उपचारासाठी मिरजच्या रुग्णालयात नेले. दुर्दैवाने तो पर्यंत राजाक्काचा प्राण गेला होता.

 

नराधम गजाआड !

आजीचा मृत्यू झाल्यानंतर नातू गणेश भोसले याने पोलिसात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले घटनास्थळी धावले. आरोपी दशरथ ज्ञानू जाधव याला पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे. 


हळहळ आणि संताप 

सत्तर वर्षाचे वय असलेल्या आपल्या आईचा जीव घेतल्याच्या या घटनेने प्रचंड हळहळ आणि संताप व्यक्त होऊ लागला आहे. काबाडकष्ट करून पन्नास वर्षाच्या मुलाला आणि त्याच्या दोन मुलांना देखील सांभाळत असलेल्या आईलाच पोटच्या मुलाने संपविल्याची घटना प्रत्येकाच्या काळजाचा वेध घेत आहे.  



हे देखील वाचा >>>


 

  

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !