BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ मे, २०२२

तीनशे वर्षाची परंपरा असलेली भेंडवळची भविष्यवाणी सार्वजनिक !




विविध हवामान संस्थांच्या अंदाजानंतर आता भेंडवळची भविष्यवाणी समोर आली असून त्यानुसार देखील राज्यातील पावसाची चांगली परिस्थिती राहणार असल्याचे समोर आल्याने यंदा चांगला पाऊस होणार याला दुजोरा मिळाला आहे. 


भारतीय हवामान विभाग तसेच स्कायमेट सारख्या संस्था वेळोवेळी हवामानाचा अंदाज व्यक्त करीत असतात. हे अंदाज कधी सत्यात उतरतात तर कधी फसलेही जातात परंतु त्यांच्या अंदाजाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते, असे असले तरी राज्यात काही ठिकाणी रूढी परंपरेपमाणे भविष्यवाणी करण्याच्या काही पद्धती आजही कार्यरत आहेत आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या देखील तितकीच मोठी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील भाकणूक राज्यात प्रसिद्ध असून दरवर्षी एक वर्षासाठी भविष्यवाणी करण्याची येथील पद्धत आहे आणि अनेक लोक या भविष्यवाणीची वाट देखील पहात असतात. राज्याच्या भविष्य काळासाठीची भविष्यवाणी येथे केली जाते. विज्ञानयुगात देखील मोठी परंपरा असलेल्या या भविष्यवाणीकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले असते आणि ही भविष्यवाणी आता सार्वजनिक करण्यात आली आहे.  


केवळ पावसाबाबतच नव्हे तर साधारणपणे देशात वर्षभरात कशी परिस्थिती असेल याबाबत येथे भाकीत करण्यात येत असते.  घट मांडणी करून ही भविष्यवाणी व्यक्त केली जात असते त्यानुसार यावर्षी पावसाला चांगला असल्याचे भाकीत येथेही व्यक्त करण्यात आले आहे. जून महिन्यात चांगला पाऊस होणार असून जुलै महिन्यात त्या तुलनेत हा पाउस कमी असणार आहे. ऑगष्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडणार असल्याची भाकणूक भेंडवळ भविष्यवाणीत करण्यात आली आहे. (Prediction of a bhendaval with a tradition of three hundred years is public) भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट या संस्थांनी देखील असाच अंदाज यापूर्वीच व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियन हवामान अंदाजानुसार देखील यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस होणार असल्याचे म्हटले गेले आहे. 


अवकाळीचा धुमाकूळ !

यावर्षी उन्हाळा सुरु झाल्यापासून राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. आत्तापर्यंत अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले असताना भेंडवळ भविष्यवाणीने देखील शेतकरी वर्गाची चिंता वाढवली आहे. यावर्षीही अवकाळी पावसाचा धुमाकूळ असेल असे भाकीत भेंडवळ भविष्यवाणीत करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. पाऊस चांगला होणार असला तरी अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी होऊ शकते असे या भाकितात म्हटले आहे. 


रोगराईचे संकट कमी 

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने मानवजातीला पूर्णपणे घेरले असून या मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. आगामी काळात मात्र रोगराईचे संकट कमी होणार असल्याचे भेंडवळ भविष्यवाणीत म्हटले गेले आहे. तथापि भारतावर आर्थिक संकट येऊ शकते आणि परकीय सत्ता भारताला नाहक त्रास देऊ शकतात परंतु भारतीय सेना या संकटावर मात करील असे देखील म्हटले गेले आहे. 


तीनशे वर्षांची परंपरा 

भेंडवळ च्या भविष्यवाणीला तीनशे वर्षांची परंपरा असून चंद्रभान महाराज यांनी घट मांडणीला सुरुवात केली होती आणि तीनशे वर्षापूर्वी भविष्यवाणी सांगण्यास सुरुवात केली होती. ही परंपरा आजही सुरु असून चंद्रभान राजांचे वंशान पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे भाकीत जाहीर करतात. हे भाकीत आता सार्वजनिक करण्यात आले आहे. 


अशी असते घट मांडणी 

अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस एका शेतात घटाची मांडणी केली जाते. गहू, ज्वारी, तूर, उडीद,  मूग, हरभरा यासह आठ प्रकारची धान्ये यात ठेवली जातात आणि घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे ठेवून त्यावर पाण्याची घागर, पान सुपारीसह काही खाद्य पदार्थ देखील ठेवले जातात. दुसऱ्या दिवशी पहाटे पदार्थात झालेल्या बदलाचे निरीक्षण करून भविष्यवाणी कथन केली जात असते.   

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !