BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ मे, २०२२

'विठ्ठल' च्या निवडणुकीत काळे गट भालके यांना शह देणार ?

 



पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरु होण्याचे संकेत मिळू लागले असून काळे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवावी अशी मागणी प्रकर्षाने पुढे आली आहे. 


पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष झाल्याने राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला आणि जनतेचे मोठे पाठबळ असतानाही भगीरथ भालके याना निवडणुकीत पराभूत होण्याची वेळ आली. राष्ट्रवादीमधील संघर्ष वरिष्ठ नेत्यांनाही मिटवता आला नाही त्यामुळे समोर असलेली नगरपालिका निवडणूक देखील राष्ट्रवादीसाठी सोपी दिसत नसताना शेतकऱ्यांचा राजवाडा असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील बंडाचे निशाण फडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवंगत आमदार भारतनाना भालके यांनी सर्वसामान्य माणसाला प्रेमाने बांधून ठेवले होते पण त्यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांची पकड सैल होत गेली आणि आता तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीलाही (Vitthal Sugar Factory Election)बंडाचे ग्रहण घरातून लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 


सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी वसंतदादांच्या नंतर राजकारणावर आपली पकड मजबूत केली आणि सहकार शिरोमणी कारखाना आणि सभासद यांची मूठ बांधण्यात त्यांना यश आले. जनसंपर्काला देखील काळे यांनी नेहमीच प्राधान्य दिले त्यामुळे चंद्रभागा परिवार विस्कटला नाही. पंढरपूर तालुक्यात मजबूत असलेल्या विठ्ठल परिवाराचा चंद्रभागा परिवार महत्वाचा घटक होता आणि आजही हा परिवार विठ्ठल परिवाराच्या सोबत आहे परंतु श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कल्याणराव काळे गटाने स्वतंत्रपणे लढवावी अशी आग्रही मागणी त्यांचे कार्यकर्तेच करू लागले आहेत त्यामुळे विठ्ठल कारखान्याची निवडणूक वेगळ्या वळणारवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

यशवंतराव चव्हाण पतसंस्था सभागृहात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक झाली आणि या बैठकीत हा विषय प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. विठ्ठल कारखाना अडचणीत असतानाही अनेकांचा डोळा निवडणुकीवर असताना अनपेक्षितरित्या ही मागणी समोर आली आहे त्यामुळे कल्याणराव काळे नेमकी काय भूमिका घेतात याकडे विठ्ठलच्या सभासदांचेच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याचेही लक्ष लागणार आहे. कल्याणराव काळे यांनी संयमीपणे राजकारण केले असून कारखान्यावर देखील मजबूत पकड ठेवली असल्यामुळे काळे गट मजबूत झालेला आहे. गावोगावी त्यांच्या गटाचे कार्यकर्ते सक्रिय आहेत आणि कल्याणराव यांचे नेतृत्व मानणारा शेतकरी वर्ग देखील मोठा आहे. शिवाय पतसंस्था, बँक, शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून देखील त्यांच्या कार्याचा विस्तार पसरलेला आहे.  

विठ्ठल परिवारात फूट ?
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे हे दोघेही एकाच राजकीय पक्षात काम करतात. भारतनानांच्या सोबत काळे यांनी काम केले आहेच पण भगीरथ भालके याना देखील काळे यांनी सहकार्य केले आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे विठ्ठलमध्ये फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काळे यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची मागणी करणारे देखील कुणी विरोधक नसून ते विठ्ठल परिवारातीलच सदस्य आहेत त्यामुळे ही मोठी फूट (Possibility of split in Vitthal Pariwar) पडण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.  

काळे यांची भूमिका काय ?
कार्यकर्त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची मागणी तर केली आहे पण कल्याणराव काळे यांची भूमिका यात महत्वाची ठरणार आहे. काळे हे काय निर्णय घेतात यावर कारखाना निवडणुकीचे आणि एकसंध विठ्ठल परिवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे. कल्याणराव काळे हे कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळतात की कार्यकर्त्यांची समजूत काढून विठ्ठल परिवार दुभंगण्यापासून वाचवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विठ्ठल परिवारातील काही घटक आधीच बंडाचे हत्यार काढून असल्याचे दिसत असताना काळे यांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे.  


हे देखील वाचा >>>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !