BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ मे, २०२२

मतदार यादीत नाव नसेल तर कार्यकारी संचालक जबाबदार !

 


मंगळवेढा : संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत नसेल तर थेट कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना जबाबदार धरण्यात येणार आहे.


सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु होताच संबंधित तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे. आरोप प्रत्यारोप आणि गटबाजी अशी राजकीय शस्त्रास्त्रे बाहेर निघू लागली आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखाना अलीकडे विविध विषयाने चर्चेत रहात असतानाच विठ्ठल परिवाराला धक्का लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तर मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये आरोप प्रत्यारोपांची आग भडकू लागली आहे त्यातच मतदार यादीत नाव नसल्यास दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकरी संचालकांना जबाबदार धरले जाईल असे आदेशपत्र प्रादेशिक सहसंचालक (साखर)  तथा जिल्हा सहकारी संस्था निवडणूक अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी दामाजी कारखान्यास दिले आहे.

 
दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २८ हजार १५२ सभासद मतदारांची प्रारूप यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत अनेक सभासदांची नावे कमी झाल्याने सभासदांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मृत्यू झालेल्या सभासदांच्या जागी त्यांच्या वारसाच्या नावाची नोंद न घेणे, थकबाकीदार सभासद आणि शेअर्सची रक्कम पूर्ण न करण्याच्या कारणावरून २ हजार ४३७ पेक्षाही अधिक सभासदांची नावे प्रारूप यादीत वगळण्यात आली असून २ हजार ५०१ साभासंदांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे.  या प्रारूप यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती घेण्यात आल्या आहेत त्यामुळे हा एक वेगळ्याच चर्चेचा विषय बनला असून सभासदात मोठी खळबळ दिसून येत आहे. 


मतदार यादीबाबत हरकती मागविण्यात आलेल्या होत्या त्यात जिल्ह्यात सर्वाधिक हरकती दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आल्या आहेत. अल्पवयीन सभासद, जिवंत सभासदांना मृत दाखविण्यात आले आणि नव्या सभासदांना कधी आणि कसे घेण्यात आले यांचा अंतर्भाव यात करण्यात आला आहे. दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालक बबनराव आवताडे, एड. नंदकुमार पवार, दौलत माने आदींच्या एक हजाराहून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. त्याची सुनावणी साखर सहसंचालक यांच्यासमोर झाली. (Damaji sugar factory election, political atmosphere hot) सुनावणीसाठी कारखान्याकडून मागविण्यात आलेले रजिस्टर कारखान्याकडून देण्यात आलेले नाही. 


माहिती दिली नाही 

कारखान्याने नवे सभासद कोणत्या बैठकीत आणि कोणत्या नियमाने वाढविण्यात आले आणि कोणत्या कारणाने सभासद कमी करण्यात आले याबाबत विचारणा करण्यात आली पण त्याची कागदपत्रे देण्यात आली नाहीत, कारखान्याने सभासदांना माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना दिली असतानाही माहिती देण्यात आली नाही त्यामुळे सुनावणीवेळी त्यांना बाजू मांडण्यात अडचणी आल्या. 


कागदपत्रे देण्याच्या सूचना 

माजी अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार प्रादेशिक साखर सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी कार्यकारी संचालकांना सूचना दिल्या असून आवश्यक कागदपत्र देण्याबाबत सांगितले आहे.  निवडणुकीचा धुरळा उडण्याच्या आधीच दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत संघर्षाचा रंग भरताना दिसू लागला आहे. 


हे देखील वाचा >>>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !