BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ मे, २०२२

यंदा नियमित वेळेच्या आधीच येणार पावसाळा !

 


मुंबई :यंदा तब्बल दहा दिवस आधीच अंदमानात मान्सूनचे आगमन होणार असल्याची वार्ता युरोपियन सेंटर फॉर रेंज वेदर फोरकास्ट ने दिली असल्याने उन्हाळा लवकर संपण्याची आशा निर्माण झाली आहे. 


मागील वर्षी राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्यानंतर यावर्षी पावसाची कशी स्थिती असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे परंतु  हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या वेगवेगळ्या  संस्थांनी यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्व अंदाजात एकसुत्रता असून एकही संस्थेने वेगळा अंदाज व्यक्त केलेला नाही. ऑस्ट्रेलियन हवामान खाते, स्कायमेट, भारतीय हवामान विभाग या सर्वानीच यावर्षी भरपूर पाऊस होणार असून पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असली तरी प्रत्यक्षात जून महिन्यात देखील पावसाची प्रतीक्षा करावी लागते परंतु यावर्षी जुलै पेक्षा जून महिन्यातच अधिक पाऊस होईल असे सर्वच संस्थांनी सांगितले आहे. त्यापाठोपाठ आता मान्सून दहा दिवस आधीच दाखल होईल असा अंदाज आलेला आहे. 


यावर्षी उन्हाळा भलताच जाचक ठरलेला असून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येत राहिली आहे. उष्माघाताच्या त्रासाने अनेक जण त्रस्त झालेले असताना पंचवीस पेक्षा अधिक जणांचे बळी उष्माघाताने घेतले आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असली तरी यंदाचा उन्हाळा हा विक्रमी असल्याचे मागील आकडेवारीवरून समोर आलेले आहे. त्यामुळे पावसाला लवकर सुरुवात झाली तर कडक उन्हापासून नागरिकांची लवकर सुटका होणार आहे. कडाक्याच्या उन्हामुळे त्रस्त असलेल्या जनतेसाठी ही दिलासादायक बातमी आलेली आहे. पावसाळा लवकर आल्यास मे महिन्याचा कडाका कमी होण्याची आशा आहे. 


दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि तो सात जून पर्यंत महाराष्ट्रात पोहोचतो. अलीकडे मात्र या तारखा नेहमीच पुढे मागे होताना दिसत असून जून महिन्यात देखील राज्यात पाऊस होत नाही त्यामुळे शेतकरी बंधूंचे डोळे ऐन पावसाळ्यात आकाशाकडे लागलेले असतात. यावेळी दहा दिवस मान्सून आधी येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने यात जर बदल झाला नाही तर लवकरच पारा खाली येईल. दरवषी १ जून रोजी केरळमध्ये येणारा मान्सून २० ते २१ मे या दरम्यान अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने मे महिन्याच्या अखेरीस तो केरळमध्ये दाखल होईल (This year the rains will come ahead of time) असे सद्याच्या हवामान अंदाजाचे स्वरूप आहे. 


तळकोकणात मान्सून 
मान्सूनचे वेळेपूर्वी आगमन होण्याची शक्यता असल्यामुळे तळकोकणात ७ जून रोजी तर मुंबईत ११ जूनपर्यंत पाऊस दाखल होणार आहे. त्यामुळे यंदा कडक उन्हाळा आणि वाढलेले तापमान यातून लवकर सुटका होण्याचे संकेत मिळत आहेत. हा अंदाज आज व्यक्त होत असला तरी मध्येच काही नैसर्गिक क्रिया बदलून अडथळा आला तर मान्सून लांबणीवर पडल्याची यापूर्वीची उदाहरणे आहेत.


जून मध्ये व्यापक !
जून महिन्याच्या मध्या पर्यंत मान्सून महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओरिसाचा भाग व्यापून टाकणार आहे. आगामी पावसाळा हा देशभरात समाधान देणारा असल्याचा अंदाज यापूर्वीच विविध हवामान अंदाज देणाऱ्या संस्थांनी दिला आहे.   


हे देखील वाचा >>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !