BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ एप्रि, २०२२

शरद पवारांच्या घरावर दगडफेक, राज्यभरातून निषेध !



मुंबई  : राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी देशातील जेष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर दगडफेक, चप्पलफेक केल्याची निंद्य घटना आज घडली असून राज्यभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. 


राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर कालच न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. विलीनिकरणाची मागणी मान्य झाली नसली तरीही या कर्मचाऱ्यानी गुलाल उधळून जल्लोष केला आणि आज त्यांनी पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक करण्याचा निंद्य प्रकार केला आहे. सुरुवातीपासून या संपात राजकारण घुसलेले असल्याचे अनेकांनी सांगितले होते त्याचाच हा एक भाग आहे काय याचाही तपास होणे आता गरजेचे बनले आहे. एवढा प्रकार घडेपर्यंत महाविकास आघाडीचे पोलीस काय करीत होते आणि गुप्तवार्ता विभाग कसा शांत होता ? असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे. 


शरद पवार यांच्या निवासस्थानी एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आणि पोलिसांची संख्या मर्यादित असल्याने आंदोलक बंगल्याबाहेर पोहोचले आणि त्यांनी हा निंद्य प्रकार केला आहे. ज्या शरद पवारांनी कायम कर्मचारी यांची बाजू घेत न्याय देण्याचे काम केले त्याच पवारांच्या निवासावर चप्पल, दगड भिरकावले गेले असल्याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.  (Stone pelting on Sharad Pawar's house) त्यानंतर पोलिसांची कुमक येथे पोहोचली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.  ही घटना घडताच महाविकास आघाडीचे अनेक नेते सिल्व्हर ओक येथे पोहोचले असून हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला आहे तर यामागे अज्ञात व्यक्तीचा हात असल्याचे राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.  


घडायला नको होते !

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याबाबत महाराष्ट्राला सहानुभूती आहे आणि त्यांच्या वेतनात वाढ व्हावी अशी महाराष्ट्रातील जनतेची देखील इच्छा आहे पण आजच्या हिंसक घटनेने ही सहानुभूती धोक्यात आली आहे. आजवर अनेक आंदोलने झाली पण अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.  अशी घटना घडायला नको होती अशाच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 


सुप्रिया सुळे म्हणाल्या -- 

राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या आंदोलकांच्या समोर आल्या आणि त्यांनी शांतपणे चर्चा करण्याचे आवाहन केले. या जमावाला शांत करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. आम्ही या क्षणी देखील चर्चेस तयार आहोत पण आपण शांत बसायला हवे' असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या परंतु हा जमाव शांत होताना दिसत नव्हता. 


अज्ञात शक्तीचा हात !

अज्ञात शक्ती पडद्याआडून वातावरण बिघडविण्यासाठी हालचाली करीत असून महाविकास आघाडी सरकार डोळ्यात खुपत आहे. आजची घटना ही दुर्दैवी आणि चिंता वाटावी अशीच आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे, न्यायालयाने निकाल दिला आहे तरीही पडद्यामागून वातावरण बिघडवले जात आहे. सुप्रिया सुळे विनंती करीत असताना समोरून येणारी भाषा अशोभनीय होती असे शिवसेना नेते संजय राउत यांनी म्हटले आहे.


राष्ट्रवादी संतप्त !

आजच्या घटनेने राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड संतापली असून आता आम्ही माफ करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. शरद पवार हे एकवेळ माफ करतील पण आम्ही माफ करणार नाही असे राष्ट्रवादी कार्यकर्ते बोलू लागले आहेत. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते 'सिल्व्हर ओक' वर पोहोचले आहेत.  


हल्लेखोर ताब्यात !

पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करणारे हल्लेखोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. या घटनेच्या मागे कोण आहे ? कुणी हे कारस्थान शिजवले आहे? याची आधी चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीतून होताना दिसत आहे.  चिथावणी देणारे बाजूला राहतील परंतु या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचे नुकसान होईल त्याला कोण जबाबदार ? असा सवाल देखील आता उपस्थित होऊ लागला आहे. एकूणच हे प्रकरण अधिक चिघळणार याचे देखील संकेत स्पष्ट होत आहेत. 


तर हे घडले नसते !

राज्यभरात या घटनेचा निषेध होत असला तरी भाजपाने मात्र अद्याप तरी निषेधाची भाषा केली नाही. संपकरी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असती तर हे घडले नसते अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. पहिल्या दिवसापासून समन्वय साधून त्यांना न्याय दिला असता तर ही घटना घडली नसती असे देखील त्यांनी म्हटले आहे.


राजकीय संस्कृतीचा अपमान !

गेली पन्नास वर्षे अप्रत्यक्ष नेतृत्व पवार साहेबांनीच केले आहे, चुकीच्या हातात कामगारांचे नेतृत्व गेले की काय होते हे आज दिसून आले अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. राजकारणात विरोध करणाऱ्यांचा सन्मान करायचा असतो हे शरद पवार यांनीच शिकवले आहे. शरद पवार यांच्या पत्नी, नात घरात असताना असा क्रूर हल्ला करणे हे दुर्दावी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसांच्या मनात या घटनेबाबत वेदना आहेत. आम्ही प्रत्युत्तर देणार नाही. पवार साहेबांनी तशा सूचना दिल्या आहेत. घटनेनंतर देखील पवार साहेबांनी कर्मचाऱ्यांचीच बाजू घेतली आहे असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.     


कारवाई तर होणारच !

या घटनेची पूर्ण चौकशी होणार आहेच पण या मागे कोण आहे याची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 



हे देखील वाचा :


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !