BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ एप्रि, २०२२

उजनीचा 'छोटा मासा' लाच घेताना गळाला लागला !

 


वैराग : लाभक्षेत्रात जमीन येत नसल्याचा दाखला देण्यासाठीच्या प्रकरणात पाटबंधारे विभागातील क्षेत्रीय कमर्चारी लाच घेताना रंगेहात पकडला गेला असून यामुळे जलसंपदा (Irrigation) कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. 


पाटाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाते पण हे पाणी कुठे आणि कसे मुरते हे शेतकऱ्यांना चांगले माहित असते. अनेक ठिकाणी बड्या शेतकऱ्याला दिलेले पाणी कागदावर येतच नाही आणि आले तरी प्रत्यक्ष दिलेल्या क्षेत्रापेक्षा कागदावर कमी क्षेत्र दिसत असते. 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' अशा पद्धतीने हा प्रकार सुरु असतो. परंतु किरकोळ कामासाठी सुद्धा लाचेची मागणी करण्यात आली आणि मोजणीदार पदावर असलेला ५३ वर्षाचा सुकदेव मारुती सुतार हा कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला गेला. शेतजमीन पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखला देण्यासाठी या कर्मचाऱ्याने तब्बल सात हजार रुपयांची लाच (Bribe) मागितली होती. 


जमीन विक्री करण्यासाठी लाभक्षेत्रात सदर जमीन येते काय ? याबाबतचा दाखला संबंधित शेतकऱ्यास आवश्यक असतो त्यामुळे तो पाटबंधारे विभागाकडे या दाखल्याची मागणी करतो. पाटबंधारे शाखेपासून उपविभागीय कार्यालयापर्यंत अशा शेतकऱ्याची अनेकदा अडवणूक केली जाते. अशा प्रकारचा दाखला हा विभागीय कार्यालय देत असते. शाखा कार्यालय केवळ सदर जमीन लाभक्षेत्रात येते किंवा नाही याबाबतचा  अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करीत असते. असा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी पाटबंधारे शाखा जवळगाव ता. बार्शी या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या सुखदेव सुतार या क्षेत्रीय कर्मचाऱ्याने संबंधित शेतकऱ्याकडे ७ हजाराची लाच मागितली. 


सदर लाच देण्याची इच्छा नसल्याने बार्शी तालुक्यातील सासुरे येथील शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि आपली तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुतार आज रंगेहात सापडला. (Irrigation employee caught red-handed taking bribe) सदर प्रकरणी सुतार याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने जलसंपदा विभागात खळबळ उडाली आहे.   


हे देखील वाचा : >>



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !