BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ एप्रि, २०२२

--- आणि अजितदादा पवार देखील झुकले !

 



बीड : नेहमी कडक भाषण ठोकणारे आणि कुणालाही न घाबरणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar)  हे भाषणाला उभे राहिले तेंव्हा झुकले आणि त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील मास्क काढून तशी कबुलीही देवून टाकली ! 

 
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे कडक व्यक्तिमत्वाचे म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्यासमोर भल्याभल्यांची भंबेरी उडते. ते संतापले की कुणालाच सोडत नाहीत. सहकारी मंत्री असला काय, किंवा पक्षाचा कार्यकर्ता असला काय ? दादा कुणाचाच पाणउतारा करायचे सोडत नाहीत. अधिकरी तर त्यांच्या जवळपास फिरकायलाही घाबरलेले असतात. अशा अजितदादांचे भाषण खुमासदार असते. हसत हसत ते बरेच काही बोलूनही जातात आणि त्यांच्या एखाद्या खुमासदार विधानांची माध्यमांसाठी बातमीही होते. असाच प्रकार आज घडला आणि पुन्हा एकदा माध्यमांना बातमी मिळाली. 


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावरचा मास्क सार्वजनिक ठिकाणी कधीच उतरत नाही, उलट जे मास्क घालत नाहीत त्यांना देखील ते बरेच काही सुनावतात. विधानसभेत बोलतानाही त्यांनी याबाबत मास्क न घालणाऱ्या आमदारांना चिमटे काढले आहेत. जाहीर सभेत बोलताना तर त्यांनी विनामास्क कार्यकर्ता दिसला की मास्क किती महत्वाचा आहे हे त्याला जाहीरपणे सुनावले आहे. त्यामुळे एरवी  मास्क  न वापरणारे देखील अजितदादाच्या आजूबाजूला जायचे असेल तर मास्क लावून जातात हा अनुभव अनेकदा आला आहे. राज्य शासनाने आता निर्बंध शिथिल केले असून मास्कची सक्ती हटवली आहे तरीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे मास्क वापरतात. नियम नसला तरी मास्क वापरावा असे मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार, आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलेले आहे. 


अजितदादा पवार हे आज बीड येथे आलेले असताना त्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेलाच होता. त्यांनी आजवर जाहीर सभेत बोलताना देखील मास्क कधी काढला नाही. बीड येथील सभेत बोलताना मात्र आपल्या हाताने आपल्या चेहऱ्यावरील मास्क त्यांना काढावा लागला आणि त्यांनी मास्क काढूनच भाषण केले.  (Ajit Pawar Removes his mask)  अजित पवार बोलण्यासाठी उभे राहिले तेंव्हा उपस्थितांनी त्यांना मास्क काढून बोलण्याचा आग्रह धरला. यापूर्वीही त्यांना अनेक सभात अशी विनंती केली पण त्यांनी मास्क तर काढलाच नाही पण मास्क काढा असे सांगणाऱ्याना बरेच काही सुनावले होते. येथे मात्र त्यांनी मास्क काढला. यावेळी अजित पवार म्हणाले, 'मास्क काढण्याबाबत आपल्न कुणाचेच ऐकत नाही पण मराठवाडा आपली सासुरवाडी आहे त्यामुळे येथे ऐकावेच लागते' अशी मिश्कील टिपण्णी करीत त्यांनी मास्क काढला आणि उपस्थितात जोरदार हशा पिकला. 


अजितदादांनी मास्क काढून आपल्या पद्धतीने खुमासदार भाषण केले पण भाषणापेक्षा त्यांनी मास्क काढला याची आणि त्याचे कारण सांगितले याचीच अधिक चर्चा रंगली आहे. दोन वर्षे चेहऱ्यावर असलेला मास्क अजितदादांनी आज पहिल्यांदा जाहीर सभेत काढला आणि केवळ सासुरवाडी असल्याने ऐकावे लागत असल्याची मिश्कील टिपण्णी त्यांनी केली. मास्क काढल्याचे अनेकांना आश्चर्यही वाटले आणि त्यांनी काढलेल्या मास्कच्या माध्यमातून बातम्या सुरु झाल्या ! 


हे देखील वाचा : 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !