पंढरपूर : पोलिसांना हवा असलेला सराईत गुन्हेगार अखेर पंढरीत सापडला असून तीन रस्त्याजवळील मोकळ्या मैदानातील एका झोपडीतून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. (Interstate criminals arrested at Pandharpur) पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे.
पोलिसांचे सदर पथक मंगळवेढ्यातील चोरीच्या संदर्भाने आरोपींचा शोध घेत मोहोळ परिसरात असताना त्यांना मारोळी (मंगळवेढा) येथील घरफोडीचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस या सराईत गुन्हेगाराची मिळवू लागले असताना त्यांना तो पंढरपूर येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार या पोलीस पथकाने त्याचा शोध सुरु केला असता हा आंतरराज्य सराईत गुन्हेगार पंढरपूर येथे तीन रस्त्याजवळ मोकळ्या मैदानात एका झोपडीत राहत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला आणि पोलिसांनी आपला मोर्चा पंढरपूरकडे वळवला.
मुसक्या आवळल्या !
गुन्हे शाखेचे पथक मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर येथील तीन रस्ता परिसरात दाखल झाले आणि त्यांनी मोठ्या कौशल्याने झोपडीत राहणाऱ्या यलप्पा उर्फ खल्या अद्रक शिंदे (वय ४०) या सराईत गुन्हेगारास जेरबंद केले. हा यलप्पा हा मुळचा कर्नाटक राज्यातील असून तो मोहोळ येथील दत्तनगर भागात राहतो. त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याने मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथील घरफोडी आपण आणि आपल्या साथीदारांनी केली असल्याचे कबूल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मारोळी येथे गुन्हा !
मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथे २७ ते २८ मार्च २२ या दरम्यान संपता पांढरे आणि त्यांचे शेजारी मारुती शिंदे यांच्या बंद घरात शिरून चोरी केली होती. घराच्या दरवाजाचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडून ९१ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
अन्य चोऱ्या उघडकीस !
पोलिसांनी सदर गुन्हेगाराकडे अधिक तपास केला तेंव्हा आणखी काही गुन्हे उघडकीस आले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील मारोळीसह लक्ष्मी दहिवडी, सलगर वु. उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव अशा एकूण पाच घरफोडी आणि चोरीचे गुन्हे त्यांनी केल्याचे उघडकीस आले. या आंतरराज्य गुन्हेगारांवर सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यात देखील काही गुन्हे दाखल आहेत.
मुद्देमाल हस्तगत
सराईत आंतरराज्य गुन्हेगाराकडून पोलिसांनी २ लाख २ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. मारोळी, सलगर बु., लक्ष्मी दहिवडी येथील चोरीच्या घटनातील ब्रिटीशकालीन चांदीची नाणी, सोन्याचांदीचे दागिने यासह मुद्देमाल हस्तगत केला आहे. १२३ चांदीची नाणी, २४ ग्राम सोन्याचे दागिने आदी माल गुन्हेगाराकडून मिळाला आहे.
हे देखील वाचा :
- रेड्यांची टक्कर, पंढरपूर तालुक्यात गुन्हा दाखल !
- गुणरत्न सदावर्ते विरोधात मराठा मोर्चा आक्रमक !
- आला ..... यावर्षीच्या पावसाचा अंदाज जाहीर झाला !
- जबरदस्तीने वर्गणी मागितल्याने गुन्हा दाखल !
- भाजप आमदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !