BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ एप्रि, २०२२

वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा पोलीस कोठडीत !

 



सातारा : एस टी कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा गोत्यात आले असून सातारा येथील न्यायालयाने त्यांना ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर मुंबईत त्यांच्या वकील असलेल्या पत्नी जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 


राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानावर संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. चप्पल, दगड भिरकावण्यात आले होते. या घटनेच्या कटात सहभागी असल्याचे आरोपावरून ऍड गुणरत्न सदावर्ते याना अटक करण्यात आली होती आणि एकूण चार दिवसाची पोलीस कोठडी त्यांना मिळालेली होती. पोलीस कोठडीनंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळताच सातारा पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने सदावर्ते यांचा ताबा मिळवला आणि काल सातारा येथे आणून त्यांना अटक करण्यात आली होती. दीड वर्षांपूवी सदावर्ते विरोधात सातारा पोलीस (Satara Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता , त्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 


छत्रपतींच्या गादीबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्धल काल सदावर्ते यांना अटक केल्यानंतर आज सातारा पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानाने त्यांना ४  दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. (Gunaratna Sadavarte again in police custody) सदावर्ते यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांची चौकशी आता सातारा पोलीस करणार आहेत. काल मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या घोषणाबाजीमुळे आज मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. न्यायालयांत सुनावणी करताना सदावर्ते यांच्या वकिलांनी सदावर्ते यांची अटक ही बेकायदेशीर असल्याचे सांगितले तर आरोपी हा वकील असून त्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली होती.  अखेर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सदावर्ते यांना चार दिवसाची कोठडी दिली आहे.  


सदावर्तेचे बेताल वक्तव्य 
एका वाहिनीवर बोलताना सदावर्ते यांनी दोन्ही छत्रपतींच्या संदर्भात बेताल वक्तव्य केले होते त्यामुळे मराठा समाज संतप्त आहे. पाटण तालुक्यातील तारळे येथील राजेंद्र निकम यांनी या बेताल वक्तव्याबद्धल सातारा पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  


काल घोषणाबाजी 

सदावर्ते यांना साताऱ्यात आणल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आणि सदावर्ते विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त मराठा क्रांती मोर्चाच्या या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आणि काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्याचे दिसले. सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी वक्तव्य केले होते. याप्रकरणी दीड वर्षांपूर्वी सातारा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यानी 'धिक्कार असो, धिक्कार असो, सदावर्तेचा धिक्कार असो' 'एक मराठा, लाख मराठा' अशा जोरदार घोषणा (Strong proclamation against Gunaratna Sadavarte)  दिल्या होत्या. 


जयश्री पाटील यांचा शोध 

शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते याच्या वकील असणाऱ्या पत्नी जयश्री पाटील यांच्याविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून आता त्यांचा शोध सुरु केला आहे. सदावर्ते यांना अटक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जयश्री पाटील यांनी  पोलीस संरक्षण सोडले होते. सरकारी वकील प्रदीप घरत  यांनी न्यायालयात जयश्री पाटील यांचे नाव घेतले होते त्यानंतर पोलिसांनी जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जयश्री पाटील या भूमिगत झाल्याचे दिसत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !