BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ डिसें, २०२१

तळीराम खुष ! अर्ध्यावर आल्या मद्याच्या किमती !


 

मुंबई : प्रत्येक वस्तूंची किंमत वाढत असताना दारू चक्क स्वस्त झाली असून किमती अर्ध्यावर आल्याने तळीराम जाम खुशीत आहेत, काही कंपन्यांनी किमती कमी केल्या असून उरलेल्या कंपन्यानाही लवकरच आपले कमी केलेले दर जाहीर करावे लागणार आहेत. 


वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली आहे, त्यात गेल्या पाच सहा वर्षात तर महागाईने कळस गाठला आहे. 'अच्छे दिन' तर आलेच नाहीत पण पहिले बरे दिवसही गायब झाले आहेत. थोड्याथोडक्या नव्हे तर प्रचंड महागाईने सामान्य माणसांचे जगणेच महाग करून टाकलेले आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि त्यानंतर तर ही महागाई कुठल्या कुठे जाऊन पोहोचली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही आता कठीण झाले आहे. महागाईचा आगडोंब उसळला असताना तळीरामांसाठी मात्र आनंदाची आणि सुखावणारी बातमी आली आहे. दारूच्या किमती चक्क निम्म्यावर आल्या असल्याने तळीराम जाम खुष आहेत. 


राज्यात मद्याचे दर प्रचंड असल्यामुळे बेकायदा दारूला प्रचंड महत्व प्राप्त झाले होते आणि सगळीकडेच अवैध दारूचा व्यवसाय फोफावला होता. शिवाय यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत होता. अवैध मार्गाचे व्यवसाय बंद तर कधीच होत नव्हते पण यामुळे हप्तेखोरी अधिकच वाढली होती. बनावट दारू समुद्रासारखी सगळीकडे वाहत होती आणि अनेकदा अशा दारूमुळे कित्येकांचे प्राणही गेलेले आहेत. अधिकृत दारू स्वस्त झाल्यास आपोआप या अनुचित मार्गाला प्रतिबंध लागणार आहे.  परवानाप्राप्त सगळ्याच दारूच्या किमती आता आपोआप खाली येणार असल्याने बेकायदा आणि बनावट दारूचे व्यवसाय बंद पडणार असून शासनालाही मोठा आर्थिक लाभ होणार आहे. स्कॉचच्या व्यवसायातून राज्याला वर्षाला शंभर कोटींचा महसूल मिळत असतो त्यातही आता वाढच होणार आहे.  हा महसूल २५० कोटीपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. विकल्या जाणाऱ्या एक लाख बाटल्यांत आता वाढ होणार असून ही वाढ वर्षाला अडीच लाखापर्यंत जाईल असा अंदाज आहे. 


राज्यात आयत होणाऱ्या विदेशी दारूच्या दरात थेट ५० टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य शासनाने १८ नोव्हेंबर रोजी घेतला आणि त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. हा निर्णय जाहीर झाला तेंव्हा तळीरामांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता पण प्रत्यक्षात दुकानात गेल्यावर त्यांना पहिलीच किंमत द्यावी लागत होती. त्यामुळे हा निर्णय कधी लागू होणार याकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. आता मात्र राज्याच्या उत्पादन शुल्क विभागानेच नवे दर जाहीर केले आहेत आणि तळीराम सुखावले आहेत. सगळेच महाग होत असताना दारू तेवढी स्वस्त झाली आणि  ती देखील इंधनासारखी पाच दहा पैशांनी नव्हे तर थेट निम्म्या किमतीवर हे दर पोहोचले आहेत त्यामुळे मद्यप्रेमी मंडळी शासनावर प्रचंड खुश आहेत.  


आयात करण्यात येणाऱ्या स्कॉचवरील उत्पादन शुल्क ५० टक्क्यांनी कमी केल्याने हे दर अर्ध्यावर आले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आता राज्यात सर्वत्र एकसारखे दर राहणार असून सद्या आठ मद्यावरील दर कमी करण्यात आले आहेत. उर्वरित कंपन्यांनाही आता लवकरच आपले दर कमी केल्याची घोषणा करावी लागणार आहे.  नव्या दरानुसार आता जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की ३ हजार ७५० रुपयांना मिळणार आहे, जिची किंमत आधी ५ हजार ७६० एवढी होती. ३ हजार ६० रुपयाला मिळणारी 'जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेंडेड व्हिस्की' आता नव्या दरानुसार १ हजार ९५० रुपयांना मिळू लागली आहे.  'जे अँड बी रेअर ब्लॅंडेड व्हिस्की' ३ हजार ६० रुपयांना मिळत होती ती आता २ हजार १०० रुपयाला मिळणार आहे.  


३ हजार ७५ रुपयांना मिळत असलेली 'ब्लँटाईन्स फाइनेस्ट ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की' आता केवळ २ हजार १०० रुपयांना मिळू लागली आहे तर ५ हजार ८५० रुपयांना मिळणारी 'शिवाज रिगल ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की' केवळ ३ हजार ८५० रुपयांना मिळत आहे.  २ हजार ४०० रुपयांना मिळत असलेली 'जॉईन्स लंडन ड्राय जीन' आता नव्या दराप्रमाणे केवळ १ हजार ६५० रुपयांना मिळणार आहे. सद्या आठ कंपन्यांच्या नव्या दराची घोषणा झाली असली तरी बाकीच्या कंपन्यांना लवकर आपले नवे दर जाहीर करावे लागणार आहेत.  त्यांच्या सद्याच्या दरात स्कॉच मिळू लागल्यामुळे ग्राहक त्याच दरातील कमी गुणवत्तेची दारू खरेदी करणारच नाहीत त्यामुळे त्यांचा व्यवसाय आपोआप बंद पडण्याचा धोका कंपन्या ओळखून आहेत. त्यामुळे त्यांना इच्छा असो वा नसो, किमती कमी कराव्याच लागणार आहेत.  


आयात केल्या जाणाऱ्या दारूवरील उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे हे दर कमी होत असले तरी आयात न केल्या जाणाऱ्या दारूच्या कंपन्यांनाही आपले दर कमी करणे क्रमप्राप्त आहे. देशी दारूपर्यंत सगळ्यांनाच हे दर कमी करावे लागणार आहेत. विदेशी दारूच्या किमती जर देशी दारूच्या किमतीएवढ्याच किंवा थोड्या फार अधिक राहिल्या तरी देशी दारूचे ग्राहक विदेशी दारू खरेदी करतील. त्यामुळे देशी दारू निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही त्यांच्या किमती कमी कराव्या लागणार आहेत. साठ रुपयाला मिळणारी १८० मिली दारूची बाटली ४० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याचे दारू विक्रेते सांगू लागले आहेत. या नव्या दरामुळे तळीराम मंडळी जाम खुष झाल्याचे दिसत आहे. दूध महाग पण दारू स्वस्त असे चित्र राज्यात पहायला मिळणार आहे आणि राज्य शासनाच्या तिजोरीत वेगाने वाढ होतांनाही दिसणार आहे. अन्नाला महाग झालेल्या सर्व सामान्य जनतेला भलेही अच्छे दिन पाहायला मिळत नसतील पण तळीरामांचे मात्र 'अच्छे दिन' यानिमित्ताने सुरु झाले आहेत.      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !