शोध न्यूज : सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती मोठे घबाड लागले असून शेतातल्या एका बंगल्यातून ३२ लाखांची बनावट दारू आणि बाटल्यांना लावण्याची बनावट लेबले आढळून आली आहेत.
सोलापूर राज्य उत्पादन शुल्क अलीकडे अवैध दारूवर धडक कारवाई करीत असून गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात येत असताना सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत पकडण्याची कारवाई होत आहे. गेल्या दोन तीन महिन्यात अशा प्रकारची दारू पकडण्याची यशस्वी कारवाई उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. वाहतूक करताना अथवा ढाब्यांवर अशा प्रकारची दारू पकडण्याची कारवाई सतत होत असताना आता मात्र सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील एका शेतात असलेल्या बंगल्यात तब्बल ३२ लाख रुपयांची बनावट दारू आणि लेबले असा मोठा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला आहे. एवढा मोठा साठा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ही दारू कुठून आणि कशी आली ? हा एकच प्रश्न अनेकांना पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हिरज येथील एका शेतात असलेल्या बंगल्यावर छापा टाकला असता सदर बंगला कुलूपबंद होता त्यामुळे कुलूप तोडून पथकाने आत प्रवेश केला. आत जाऊन पहिले असता एका खोलीत दारूच्या बाटल्यांचे अनेक बॉक्स असल्याचे दिसून आले. उत्पादन शुल्क विभागाला मिळालेली गोपनीय माहित सत्य असल्याचे निष्पन्न झाले. गोवा राज्य निर्मित वेगवेगळ्या ब्रँडची दारू असलेले बॉक्स या खोलीत ठेवलेले होते. आय बी आणि मॅकडोल नंबर १ दारूच्या बाटल्यांच्या बॉक्ससह आय बी आणि मॅकडोल नंबर १ या कंपनीच्या नावांची लेबल्स असा ३२ लाख १९ हजार ९२० एवढ्या किमतीचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे.
धाड टाकण्यात आली तेंव्हा सदर बंगल्यात कुणीही नव्हते त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग आता हा बंगला तसेच शेती कुणाची आहे ? याचा शोध घेत आहेत. वाहतूक करणारी कुठलीच वाहने येथे आढळून आली नाहीत परंतु सदर दारू विक्री करण्यासाठीच येथे ठेवण्यात आली होती असे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे. (A large quantity of Goa-made liquor seized in Solapur district) या आर्थिक वर्षातील सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे अशी माहितीही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !