मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच शहरी आणि ग्रामीण भागात विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार असल्याचे आता महावितरणने जाहीर केले आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हे नवे संकट सहन करण्याची वेळ येणार आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे, राज्यात उष्णतेच्या लाटा येत आहेत आणि घामाच्या धारा लागू लागल्या आहेत. विजेची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागली असताना कृषीपंपासाठी दिल्या जात असलेल्या विजेच्या वेळेत देखील कपात करण्यात आली आहे आणि आता घरगुती विजेचे देखील भारनियमन करण्याची घोषणा महावितरणने केली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या मोठ्या संकटाचा त्रास सहन करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारनियमनाचे संकेत मिळत होते पण आता महावितरणनेच तात्पुरते भारनियमन करावे लागणार असल्याचे जाहीर केले आहे.
तापमान वाढत असल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झालेली असतनाच कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. केंद्र शासनाने वेळीच कोळसा उपलब्ध करून दिला नाही तर भारनियमन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे उर्जामंत्री नितीन राउत यांनी आधीच सांगितले होते. गुजराथकडून वीज खरेदी करण्याचा पर्याय देखील उर्जा विभागाने निवडला आहे तथापि राज्यात अडीच ते तीन हजार मेगावॅट विजेची तूट निर्माण झाल्याने ही तूट भरून काढण्यासाठी आवश्यकतेनुसार ग्रामीण आणि शहरी वीज वाहिन्यांवर तात्पुरते भारनियमन करावे लागणार असल्याचे महावितरणने सांगितले आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून तापमानात सतत वाढ होत असून विजेचा वापर वाढला आहे. उद्योगांसह शेतीचा वीजवापर अधिक प्रमाणात वाढला असून राज्यात २८ हजार मेगावॅट विजेची मागणी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ४ हजार मेगावॅटने मागणी वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून २५ हजाराच्या जवळ ही मागणी गेली आहे. या परिस्थितीत विजेची तूट निर्माण होत असून आवश्यकतेनुसार भारनियमन कारवाई लागणार आहे. वाढते तापमान आणि उकाडा यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना हा मोठा झटका असून उन्हामुळे बाहेर पडता येत नाही आणि आता भारनियमानामुळे घरात देखील थांबता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
हे देखील वाचा :
- जळालेला ऊस पाहून शेतकरी महिलेचा मृत्यू !
- भाजप आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश !
- अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू !
- घरगुती वापराची वीज देखील महागली !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !