बीड : भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यासह ३८ जणांच्या वर दरोड्याचा गुन्हा दाखल करावा असा आदेश उच्च न्यायालयाच्या ( High Court) औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.
माधुरी चौधरी यांच्या फिर्यादीवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह ३८ जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात आठ महिन्यांपूर्वी एक गुन्हा दाखला झाला होता. धस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने घराची संरक्षक भिंत पाडली, संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने साहित्य ते घेऊन गेले अशा फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या कलमांबाबत फिर्यादी चौधरी याना आक्षेप होता परंतु त्याची दखल पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे चौधरी यांनी सुरेश धस आणि अन्य आरोपीवर लावण्यात आलेल्या कलमात वाढ करण्याची मागणी थेट उच्च न्यायालयात केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.
उच्च न्यायालयाने भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह ३८ जणांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात कलम वाढविण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय दंड विधान कलम ३९५ (दरोडा), कलम ४४८ (बेकायदेशीररित्या घरात घुसणे), कलम ४५३ ( चुकीच्या पद्धतीने रोखून भीती दाखवणे) कलम ३४१, ५०४, ५०६ (शांतता भंग करणे आणि अन्य) अशी कलमे वाढविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह ३८ जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Court orders filing of robbery case against BJP MLA) न्यायालयाच्या आदेशामुळे पोलिसांना ही कलमे वाढवावी लागणार आहेत.
राजकीय वाद !
फिर्यादी माधुरी चौधरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदार सुरेश धस यांच्या पॅनलविरुद्ध निवडणूक लढवली होती. याचा राग मनात धरून धस यांच्या कार्यकर्त्यांनी माधुरी चौधरी आणि त्यांचे पती मनोज चौधरी याना मानसिक त्रास दिला अशी माधुरी चौधरी यांची तक्रार आहे. धस आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी चौधरी यांचे घर आणि हॉटेलची तोडफोड केल्याचा आरोप सुरेश धस यांच्यावर आहे.
हे देखील वाचा :
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !