सोलापूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासह सोलापूर जिल्ह्यातील पाच सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे (Co-operative Society Election) आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले असून जिल्ह्यातील एक दूध संघ आणि तीन सुत गिरण्याचा देखील यात समावेश आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्यातील अनेक सहकारी संस्थाची मुदत संपली असतानाही या निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या. यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही रखडलेल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट आता जवळपास संपलेलीच असून राज्यातील अनेक जिल्हे कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यामुळे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून सहकार निवडणूक प्राधिकरणाने मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यात सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखाने, ( Solapur District Sugar Factory Election Process) तीन सहकारी सूतगिरणी, एक दुध संघ यांचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश झाल्यामुळे आता प्रशासन वेगाने हालचाली करणार असून एप्रिल महिन्यात प्रारूप यादी अंतिम करण्यात येईल आणि मे अथवा जून महिन्यापर्यंत निवडणुका होवून नवे संचालक मंडळ या संस्थावर स्थापित होणार आहे. सहकारी संस्थांची मुदत संपली तरी निवडणुका न झाल्याने गेल्या काही काळापासून या संस्थांच्या निवडणुकांचा विषय सतत चर्चेत राहिला आहे. साखर कारखान्यांची निवडणूक ही स्थानिक राजकारणात देखील अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते आणि या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष असते.
प्रक्रिया सुरु करा !
मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरु करण्याबाबत सहकार निवडणूक प्राधिकरणाने हे आदेश काढले आहेत. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या काळात मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे हे आदेश आहेत. १ एप्रिल २०२२ पर्यंत पात्र असलेल्या सभासंदांची प्रारूप यादी एप्रिलमध्ये तयार करण्यात येणार आहे.
८९ संस्थांची निवडणूक !
राज्यातील २५ जिल्ह्यातील ८९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत हे आदेश आहेत. सोलापूर, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, परभणी, जालना, औरंगाबाद, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, धुळे, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा यात समावेश आहे. मे महिन्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर होऊन जून महिन्यापर्यंत या सहकारी संस्थावर नवे संचालक मंडळ स्थापित होईल.
या संस्थांची निवडणूक
सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, ( Vitthal sahakari sakhar karakhana) गुरसाळे, संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा, संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना पडसाळी, (माढा), भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर, (मोहोळ), कै. वसंतराव नाईक सहकारी सूतगिरणी सोलापूर, श्री स्वामी समर्थ शेतकरी सहकारी सूतगिरणी वळसंग, शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोला, शिवामृत सहकारी दूध संघ अकलूज या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
हे देखील वाचा :
- सोलापूर जिल्ह्यतील आणखी एका तरुण शेतकऱ्याची आत्महत्या !
- सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्यात शाळा, वेळेत मात्र बदल !
- शाळेतील खिचडीत पालीचे तुकडे, विद्यार्थ्यांना विषबाधा !
- हप्त्यासाठी सलून व्यावसायिकावर खुनी हल्ला !
- सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची लेक बनली फौजदार !
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !