BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ मार्च, २०२२

तहसीलदार यांना चिरडण्याचा वाळू तस्करांचा प्रयत्न !



औरंगाबाद : वाळू तस्करांचा आणखी एक प्रताप समोर आला असून वैजापूर तहसीलदारांना जेसीबीने चिरडण्याचा धक्कादायक प्रयत्न करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. (Sand smuggler)


राज्यात सगळीकडेच वाळू माफिया फोफावले असून त्यांची हिम्मत वरचेवर वाढत असून अधिकारी, कर्मचारी यांच्या जीवावर उठताना दिसत आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी वाळू चोरीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेले तर त्यांच्यावर हल्ला करणे, अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार वाढीला लागलेले आहेत. वाळू चोरांना सरकारच्याच झारीतील शुक्राचार्य यांचे छुपे सहकार्य असते असे देखील बोलले जात असते. वाळू तस्करीतून मिळणारा मुबलक पैसा आणि त्यांतून फोफावणारी गुंडगिरी आता अधिकाऱ्यांच्या देखील जीवावर बेतू लागली आहे. (Attack on Tehsildar)


अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार राहुल गायकवाड यांना जेसीबीच्या सहाय्याने चिरडून मारण्याचा धक्कादायक आणि थरारक प्रयत्न झाला आहे. अखेरच्या क्षणी काहीच पर्याय नसल्यामुळे तहसीलादाराना तेथून जीव वाचवून पळावे लागले. ते पळून गेले म्हणूनच त्यांचा जीव वाचला अन्यथा वाळू माफियांचे ते 'शिकार' झाले असते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकारी यांना आपला जीव गमवावा लागला होता तर तहसीलदार जखमी झाल्याची घटना समोर आली होती.


सदर थरारक घटनेबाबत शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु महाराष्ट्रात या घटनेने खळबळ उडवून दिली आहे आणि वाळू माफियांची मुजोरी आता कुठपर्यंत जाऊन पोहोचली आहे याची साक्ष ही घटना देताना दिसत आहे. अवैधरित्या वाळूची चोरी आणि वाहतूक याबाबत सतत तक्रारी येत असल्याने वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार आपल्या पथकासह वाळू माफियांच्या मागावर होते. शिवना नदीच्या पात्रातून लाखणी शिवार परिसरात बेकायदा वाळूची चोरी सुरु असल्याबाबतची माहिती तहसीलदार गायकवाड यांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकासह संबंधित ठिकाणी धाव घेतली आणि तेथे वेगळाच थरार (Dangerous thrill) घडला.


तहसीलदार आणि त्यांचे पथक नदीच्या पात्रात गेले असता एका जेसीबीच्या मदतीने हायवा टिप्परमध्ये वाळू भरली जात असल्याचे त्यांना दिसले. तहसीलदार यांचे पथक जवळ आल्याची चाहूल लागताच टिप्परचालक तेथून पळून गेला परंतु जेसीबी जागेवरच उभा होता. पथक येत असल्याचे पाहून जेसीबी चालक तेथून पळाला. दरम्यान तीन बुलेटवरून पाच सहा जण तेथे पोहोचले. त्यांनी कारवाई न करण्याबाबत विनंती केली पण तहसीलदार यांनी ती अमान्य केली. जेसीबी ताब्यात घेण्याची कारवाई करण्यासाठी पथक पुढे जात असतानाच तेथे मुळे नाव असलेला एक व्यक्ती आणि त्यांनी जेसीबी ताब्यात घेण्यापासून पथकाला रोखले.


विनंती करूनही तहसीलदार ऐकायला तयार नसल्याचे पाहून आलेले लोक काहीसे आक्रमक होण्याच्या मार्गावर दिसत होते. पथकाने पोलिसांना देखील फोन केला. तेवढ्यात एकाने जेसीबी सुरु करून पळविण्यास सुरुवात केली. ही वाहने रोखण्याचा प्रयत्न होत असतानाच एकाने हातात दगड घेतला आणि तहसीलदार गायकवाड यांना मारला. एवढ्यावर तो थांबला नाही तर त्याने तहसीलदार यांच्या अंगावर जेसीबी घालण्याची सूचना केली त्यानुसार त्या व्यक्तीने तहसीलदार यांच्या दिशेने जेसीबीची सोंड वेगाने फिरवली. जीव वाचविण्यासाठी पथक पळू लागले असताना देखील त्यांना चिरडण्याचा प्रयत्न जेसीबीच्या सोंडेच्या सहाय्याने करण्यात आला.


वेगात आलेला जेसीबी तहसीलदार यांच्या अंगावर जात असताना त्यांचे सुरक्षा रक्षक पुढे झाले आणि त्याने तहसीलदार यांना बाजूला ढकलले. प्रसंग कठीण असल्याचे लक्षात येताच सुरक्षा रक्षकाने आपली परवानाधारक बंदूक जेसीबी चालकावर रोखली. त्यामुळे तहसीलदार या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. बंदूक पाहून जेसीबी अंगावर घालणारा उडी मारून तेथून पळून गेला. जवळपास अर्धा तास हा थरारक थरार सुरु होता. बंदुकीच्या धाकामुळे वाळू तस्कर तेथून पळून गेले आणि तहसीलदार तसेच त्यांचे पथक बचावले. नंतर या पथकाने जेसीबी आणि हायवा जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केला. (Action on sand smuggling)


अचानकपणे या पथकावर जीवघेणा हल्ला सुरु झाला होता त्यामुळे पथक गोंधळून गेले. पथकासोबत पोलिसांचा बंदोबस्त देखील नव्हता त्यामुळे तहसीलदार आणि त्यांच्या पथकाला येथून पळ काढण्याशिवाय पर्याय नव्हता. पळून जात असलेल्या पथकाला देखील चिरडण्याचा प्रयत्न सुरूच होता परंतु ऐनवेळी सुरक्षा रक्षकाने बंदूक रोखली आणि अनेकांचा जीव वाचला. वाळू माफियांना स्थानिक राजकारणाचे पाठबळ असल्याची चर्चा नेहमीच सुरु असते आणि त्यामुळेच त्यांचे मनोबल वाढलेले असते. शासकीय अधिकारी यांना हप्ते देण्याची तयारी वाळू तस्करांची असते. हप्ते घ्या पण वाळू चोरी करू द्यावी अशी त्यांची अपेक्षा असते . जे कुणी अधिकारी अशा गैर प्रकाराला बळी पडत नाहीत त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला केला जातो.

हे देखील वाचा : 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !