पंढरपूर : कुटुंबासह आत्महत्या करण्याची सूचना देवून बेपत्ता झालेले महावितरणचे सहायक अभियंता गणेश वगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंढरपूर पोलिसांनी दोन पत्रकारांसह तिघांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणच्या भोसे शाखेत कार्यरत असलेले सहायक अभियंता गणेश वगरे यांनी कुटुंबासह आत्महत्या करीत असल्याची सूचना दिली होती आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली होती आणि पोलीस त्यांच्या शोधत होते. वगरे आणि कुटुंबियांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने चिंता वाढीस लागलेली असतानाच पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि कर्नाटक मधून त्यांना पंढरपूर येथे घेवून आले. वगरे यांनी काही जणांच्या नावांचा उल्लेख करून आपल्या आत्महत्येस तेच जबाबदार असतील असे म्हटले होते. सुदैवाने त्यांनी आत्महत्या केली नाही पण आता या प्रकरणाची चौकशी मात्र अटळ आहे.
पटवर्धन कुरोली येथील नामदेव विश्वनाथ खेडेकर यांनी विजेचे बिल न भरल्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यातून आलेल्या रागातून त्यांनी आपल्याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. यावर चौकशी होऊन या तक्रारीत काही तथ्य नसल्याचे समोर आले होते. त्यानंतरही खोट्या तक्रारी सुरु होत्या आणि त्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. या बातम्यामुळे होत असलेल्या बदनामीला वगरे कंटाळले होते. महालिंग दुधाळे आणि अविनाश उर्फ बंडू साळुखे हे दोन पत्रकार आपणाशी वारंवार संपर्क करून बातमी न छापण्यासाठी पैशाची मागणी करीत होते. लवकर तडजोड करा, त्याशिवाय तुमची बदनामी थांबणार नाही असे सांगत होते अशा प्रकारची तक्रार महावितरणचे सहायक अभियंता गणेश वगरे यांनी पोलीसात दाखल केली आणि त्यानुसार पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी तिघांच्या विरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
काय घडले होते !
महावितरणच्या भोसे येथील शाखेचे सहाय्यक अभियंता गणेश वगरे हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह गुरुवारी ३ फेब्रुवारीच्या सायंकाळी बेपत्ता झाले त्यांनी काही लोकंची नावे नमूद करून आपण कुटुंबासह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे अशी सूचना देवून वगरे कुटुंब बेपत्ता झाले . करकंब पोलीस त्यांचा शोध घेत असताना वगरे यांचे शेवटचे लोकेशन सांगोला तालुक्यात असल्याचे दिसून आल्याने सांगोला पोलिसांना देखील सतर्क करण्यात आले होते.
महावितरण कंपनीत सहाय्यक अभियंता असलेल्या वगरे यांनी आपण कुटुंबासह आत्महत्या करण्याचा दृढ निश्चय केला असल्याचे म्हटले आणि बेपत्ता झाले त्यामुळेच अधिक चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करीत हेच लोक आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आणि त्यांच्यामुळेच आपण आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे त्यांनी सांगितले होते. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील रहिवाशी, एका संघटनेचा पदाधिकारी आणि त्याचा भाऊ यांच्यामुळे आपणास प्रचंड मानसिक त्रास होत आहे. विजेचे बिल न भरल्यामुळे वायरमन यांनी त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या रागातून हा त्रास दिला जात आहे. स्थानिक वर्तमानपत्रात बातम्या छापून आणून आपली नाहक बदनामी केली जात आहे . या बदनामीमुळे आपण आणि आपले कुटुंब नैराश्यात गेलो आहोत. याच नैराश्यातून आपण पत्नी आणि दोन मुलींसह जीवनयात्रा संपविण्याचा दृढनिश्चय केला आहे असे त्यांनी म्हटले होते.
एका संघटनेचा पदाधिकारी, त्याचा भाऊ आणि दोन पत्रकार यांनी आपणास आत्महत्येस प्रवृत्त केले असून आपल्या पाठीमागे माझी नाहक बदनामी करणाऱ्याना कुठल्याही प्रकारची दया दाखवू नये, माझे हसते खेळते कुटुंब त्यांच्या नाहक त्रासामुळे उध्वस्त होत आहे. समाज माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत होता पण आता तो संशयाने पाहत आहे त्यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण झाले आहे, त्यातूनच हे टोकाचे पाउल उचलत असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते.
सांगोला तालुक्यातील वाटंबरे- निजामपूर रोड परिसरातील त्यांचे लोकेशन मिळाले पण वगरे यांनी आपला मोबाईल बंद ठेवलेला होता. वगरे यांच्याकडे पांढऱ्या रंगाच्या हुंडाई गाडी (एम एच १२, एस क्यू ३८१६) आहे. अशी गाडी अथवा संबंधित कुटुंब यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले होते. पोलिसांना लगेच शोध लागला नसला तरी त्यांचा शोध लवकर घेतला जाईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले होते आणि अत्यंत जलद गतीने पोलिसांनी वगरे यांचा कुटुंबासह शोध घेतला. कर्नाटक राज्यातून त्यांना शोधून पोलीस पंढरपूर येथे त्यांना घेऊन आले होते आणि आता वगरे यांची फिर्याद घेऊन तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !