अहमदनगर : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आ. रोहित पवार यांच्यावर पंढरपूर, करमाळा यासह पाच विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवली असून याबाबत रोहित पवार यांनीच ही माहिती दिली आहे.
कर्जत जामखेड विधासभा मतदारसंघात जाऊन विजय संपादन करणारे आ. रोहित पवार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी देखील परिश्रम घेणार आहेत. राष्ट्रवादीसाठी महत्वाचे असलेले पाच मतदारसंघ मजबूत करण्याची जबाबदारी रोहित पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघाच्या सोबतच पंढरपूर, करमाळा, श्रीगोंदा, उस्मानाबाद, भूम- परांडा या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्यावर ही जबाबदारी सोपवली असून पक्षाच्या आदेशाप्रमाणे पुढील काळात सदर मतदारसंघात संघटन वाढीसाठी नेटाने प्रयत्न करणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
पाचही मतदारसंघातील पक्षाचे जुने आणि नवे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मदतीने कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला जाईल आणि त्यांच्या विश्वासाच्या बळावरच पुढील सर्व निवडणुकीत सदर मतदार संघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा ठाम विश्वास आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघात दिवंगत आमदार भारतनाना भालके यांनी मजबूत संघटन केले होते, सर्वसामान्य माणसांना भारतनाना भालके हे आपल्या कुटुंबातील एक सदस्य वाटत होते परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची घडी विस्कटली. अंतर्गत कलहाने पंढरपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीला खिळखिळे केले आहे. पक्षाची ताकद मोठी असताना देखील महाविकास आघाडीने दिलेले उमेदवार भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलेला आहे.
या पराभवानंतर तरी अंतर्गत वाद शमेल अथवा तो शमविण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून ठोस उपाय केला जाईल अशी अपेक्षा होती परंतु तसे काहीच घडले नाही. पक्षाची शक्ती मजबूत असतानाही अंतर्गत राजकारण अधिक प्रमाणात होत आहे. त्यातच आता समोर पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक येऊन उभी राहत आहे. या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या अंतर्गत वाद संपुष्टात येणे किंवा आणणे पक्षासाठी आवश्यक ठरणार आहे. विधानसभा पोट निवडणुकीच्या आधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा वाद मिटल्याचे सांगण्यात आले पण प्रत्यक्षात निवडणुकीत तसे दिसलेही नाही आणि राष्ट्रवादीच्या भक्कम आणि मजबूत उमेदवारालाही पराभवाचा सामना करावा लागला. भगीरथ भालके यांचा पराभव होण्यासाठी दुसरे कोणतेही मजबूत कारण नव्हते. अंतर्गत वाद नसता तर तालुक्यातील आजचे चित्र वेगळे दिसले असते.
पंढरपूर राष्ट्रवादीतील कलह संपुष्टात आणण्याची मोठी जबाबदारी आ. रोहित पवार यांच्याच खांद्यावर आलेली आहे. सर्वांची मुठ बांधण्याची कुवत रोहित पवार यांच्याजवळ असल्याने पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी एकसंध होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीने आता कणखर भूमिका घेऊन हा वाद मिटविण्याची गरज आहे, पक्षाला मारक ठरणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची देखील आता वेळ आलेली आहे. रुसवे फुगवे काढण्यासाठी अधिक वेळ पक्षाकडेही उरलेला नाही कारण नगरपालिका निवडणूक अगदी नजरेच्या टप्प्यात आलेली आहे.
श्रीगोंदा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत तर करमाळा येथे संजय शिंदे हे आमदार आहेत. राष्ट्रवादीचा भाग असूनही येथे या पक्षाला पाचव्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. उस्मानाबाद तसेच भूम परांडा या मतदार संघात शिवसेनेचे आमदार असून या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादीला मोठा फटका बसलेला आहे. त्यात पवारांचे नातेवाईक असलेल्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपशी घरोबा केलेला आहे. ही आव्हाने देखील आ. रोहित पवार यांच्यावर असून त्यांच्यातील क्षमता विचारात घेऊनच ही महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असल्याचे दिसत आहे.
................
महत्वाच्या बातम्या : पंढरपूर तालुक्यात दोन आत्महत्या !
- लग्नाची झाली तयारी आणि पोलिसच आले घरी !
- कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या सूचना !
- सोलापूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांना कोट्यवधींचा दंड !
- लग्नासाठी रचली चिता आणि घेतले पेटवून !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !