BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ मार्च, २०२२

सोलापूर जिल्ह्यातही पिकतेय अफूची शेती !




बार्शी : पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील अफू शेती उघडकीस आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातच बार्शी येथे तीन शेतकऱ्यांनी अफूची लागवड मोठ्या कौशल्याने केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. Opium cultivation in Solapur district )

शेतीच्या विविध अडचणीमुळे शेतकरी संकटात असतानाच वीज बिले थकवल्याने महावितरणकडून थकीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणखी अडचणीत येत आहे, अलीकडेच पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे एका शेतकऱ्याने चक्क कायद्याने बंदी असलेल्या अफूची लागवड केल्याचा प्रकार समोर आला असताना आता बार्शी तालुक्यात देखील असा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहेच पण सोलापूर जीळाय्त असे प्रकार आढळून येवू लागल्याने चर्चेचा विषय बनला आहे. 


बार्शी तालुक्यातील फफाळवाडी येथे कांदा आणि भुईमुगाच्या पिकात मोठ्या प्रमाणत अफूची लागवड केली असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. येथील काही शेतकऱ्यांनी कायद्याने बंदी असलेल्या अफूची लागवड करून विकण्याच्या हेतूने जोपासली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अधिक माहिती मिळवत या शेतात धाड टाकली असता हा प्रकार उघडकीस आला.  येथे चार ते पाच प्लॉटमध्ये अफुसदृष्य अमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड केली असल्याचे निदर्शनास आले. 


तीन शेतकऱ्यावर गुन्हा !

कांद्याच्या आणि भुईमुगाच्या पिकात अफूची लागवड केल्याप्रकरणी तीन शेतकऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रामेश्वर गोरख फफाळ, अरुण धर्मा फफाळ,  दत्तात्रय उर्फ दादा रामभाऊ फफाळ अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. या शेतकऱ्यांच्या शेतातून १४ लाख ५४ हजार ७८० रुपये किमतीची ७२७ किलो वजनाची अफू पोलिसांनी जप्त केली आहे. गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कायदा कलम १५, १८ नुसार ही करवाई करण्यात आली आहे. (Case filed against the farmer) 


जिल्ह्यात चर्चा !

शेतकरी सतत अडचणीत आणि संकटात असल्याचे दिसते, शासनाचे धोरण आणि नैसर्गिक संकटे आणि शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळणे यामुळे शेतकऱ्याचे सतत हाल सुरु असतात. शेती परवडत नाही अशी ओरड अलीकडे मोठ्या प्रमाणात होत असतानाच शेतकरी अनुचित प्रकाराकडे ओढला जाऊ लागला  आहे, सोलापूर जिल्ह्यात असे प्रकार घडत नव्हते परंतु अलीकडे सोलापूर  जिल्ह्यात देखील असे प्रकार आढळून येताना दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यात अशा घटनांची चर्चा सुरु झाली आहे. 


पंढरपूर तालुक्यात अफू !

पंढरपूर ( Pandharapur ) तालुक्यातील सुस्ते येथे हा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता.  सुस्ते येथील एका शेतात अफूची लागवड केली असल्याची गुप्त माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर शेतात छापा टाकून पाहणी केली असता येथे खरोखरच शेतात अफू लागवड केली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. पोलिसांनी अफूची पाचशे बासष्ठ रोपे आणि अफूची बोंडे हस्तगत केली असून शेतकरी तानाजी जाधव यास अटक करण्यात आली. अफू, गांजा अशी लागवड करण्यात भारतात बंदी आहे पण एका शेतकऱ्याने हे धाडस केल्याचे सुस्ते येथे आढळून आले आणि एकच खळबळ उडाली होती. 


बंदी असलेल्या अफूची लागवड केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आपल्या पथकासह संबंधित शेतात धाव घेतली. यावेळी मक्याच्या पिकात अफू लागवड केली असल्याचे पोलिसांना दिसून आले.   तानाजी रावसाहेब जाधव यांच्या शेतात हा धक्कादायक प्रकार पोलिसांना आढळून आला असून पोलिसांनी ही अफू हस्तगत केली आहे आणि शेतकरी तानाजी जाधव या शेतकऱ्यास अटक केली आहे. २९ हजार ५०० रुपये किमतीची ही अफू पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुस्ते परिसरात खळबळ उडाली.  देशात अनेक ठिकाणी अफूची लागवड केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत पण पंढरपूर तालुक्यात देखील असा प्रकार समोर आल्याचे आश्चर्य व्यक्त होत  आहे.  (Solapur Crime )


आणखी वृत्त : 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !