BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ मार्च, २०२२

अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यात द्राक्षबागांचे नुकसान !

 



पंढरपूर : ऐन उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून तालुक्यात ५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Unseasonal rain)


शेतकरी एकेका संकटाना तोंड देत असताना अवकाळी पावसाचे नवे संकट अचानक समोर उभे राहिले आहे. वीज वितरण कंपनी विद्युत पुरवठा खंडित करीत असल्याने शेतकरी सद्या अस्वस्थ आणि अडचणीत येताना दिसत असून त्यांची पिके देखील धोक्यात येत आहेत. रात्रीच्या वेळेस देखील पुरेशी वीज मिळत नाही आणि त्यात थकित वीज बिलामुळे महावितरण वीज पुरवठा तोडत आहे या तणावात शेतकरी असतानाच पुन्हा निसर्गाचा अवकाळी फटका बसू लागला असून काल झालेल्या पावसामुळे नुकसानीस सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. 


उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असताना राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीठ देखील झाली आहे. उन्हाळ्यामुळे तापमानात वाढ होत असतानाच अचानक हवामानात मोठा बदल झाला असून ढगाळ हवामान आणि हवेत गारठा निर्माण झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात या अवकाळी पावसाने आपली हजेरी लाऊन शेतकऱ्याचे नुकसान केले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक धोका द्राक्ष बागांना होता असून अंतिम टप्प्यात आलेल्या द्राक्षांचे होणारे नुकसान मोठे असल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. पाऊस होणार असल्याची सूचना आधीच हवामान विभागाकडून प्राप्त झाली होती आई त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात देखील विविध भागात अवकाळी पाऊस झाला आहे. (Unseasonal rain in Pandharpur taluka)


कुरोलीत सर्वाधिक पाऊस 

पंढरपूर तालुक्यात काल मध्यरात्रीनंतर ठिकठिकाणी पाऊस झाला परंतु पटवर्धन कुरोली येथे सर्वाधीक म्हणजे १८ मिमी पाउस पडला. भंडीशेगाव ९ मिमी, भाळवणी - ७ मिमी, कासेगाव- ५ मिमी. पुळूज - ७ मिमी., चळे - ३ मिमी. तर पंढरपूर येथे ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. करकंब, तुंगत विभागात मात्र हा पाऊस झाला नाही.  कालचा  एकूण पाऊस हा ५७ मिमी असून सरासरी ६.३३ मिमी पाऊस पंढरपूर तालुक्यात झाला आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकरीवर्गाला बसू लागला आहे. 


शेतकरी चिंतेत !

अवकाळी पावसाचा मोठा फटका दरवर्षीच शेतकऱ्यांना बसत असून उन्हाळ्याच्या सुरुवातीला आलेल्या या अवकाळीने शेतकरी बांधावेत चिंता निर्माण केली आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसाने पहिला फटका दिल्यानंतर आता पुन्हा अवकाळीची हजेरी लागू लागली आहे. मोठ्या कष्टाने आणि खर्च करून वाढविलेल्या द्राक्ष बागा संकटात येत आहेत शिवाय गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांची काढणीची वेळ असल्याने हाताशी आलेला घास हा अवकाळी हिसकावून घेत असल्याचे दिसत आहे. 


माळशिरस येथे पाऊस !

पंढरपूर तालुक्यासह परिसराच्या भागातही अवकाळीने हजेरी लावलेली असून महूद, माळशिरस या भागात देखील पाऊस झाला आणि शेतकऱ्यांची  तारांबळ उडाली. हा पाऊस  मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी रब्बी पिके आणि फळबागा यांच्यावर विपरीत परिणाम करणारा हा पाऊस आहे. ज्वारी, गहू, हरभरा ही पिके आता अंतिम टप्प्यात असल्याने ती भिजून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन देखील झाले नाही. 


मका भिजली !

महूद परिसरात देखील सतत ढगाळ वातावरण असताना अचानक आलेल्या पावसामुळे वाळत टाकलेली ४० पोती मका भिजून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. महीम येथील मोहन शिवाजी गुन्नर या शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रात मक्याचे पीक घेतले होते. मका काढून त्यांनी वाळत घातली होती पण अचानक रात्रीच्या वेळी आपल्या या अवकाळी पावसाने त्यांची संपूर्ण मका भिजून गेली आहे. महूद परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने उभ्या पिकांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !